(रत्नागिरी / प्रतिनिधी)
चढ-उतारांच्या घाटातून आणि सपाट रस्त्यांवरून वेग, संतुलन आणि सहनशक्तीचा थरार अनुभवत रत्नागिरीकरांनी रविवारी सायकलिंगचा अनोखा जल्लोष साजरा केला. रत्नागिरी सायकलिस्ट क्लब आयोजित ‘रोलर कोस्टर सायक्लोथॉन – पॉवर्ड बाय हॉटेल विवेक’चे तिसरे पर्व अत्यंत उत्साहात आणि स्पर्धात्मक वातावरणात पार पडले.
जवळपास ५० किलोमीटर अंतराच्या या देशपातळीवरील सायकल स्पर्धेत सुमारे तीन तास भाट्ये-गावखडी-भाट्ये या मार्गावर स्पर्धकांनी दमदार कामगिरी सादर केली. मुलांच्या गटात साईराज भोईटे, तर मुलींच्या गटात शमिका खानविलकर यांनी अव्वल स्थान पटकावले. पुरुषांच्या विविध गटांत हर्षल खांडवे, डर्विन व्हिएगास, आस्ताद पालखीवाला यांनी तर महिलांच्या गटात प्रीती गुप्ता, योगेश्वरी कदम, किरण जाधव यांनी प्रथम क्रमांक मिळवला.
स्पर्धेचे उद्घाटन रविवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास भाट्ये ग्रामस्थ आणि शेकडो सायकलप्रेमींच्या उपस्थितीत झाले. ‘दिमाग से खेलेगा वही जितेगा’ अशी या वर्षीच्या सायक्लोथॉनची टॅगलाईन विशेष ठरली. भाट्येचा पहिला चढ, गोळपचा उतार, पावस बायपासचे वळण, गावखडीचा तीव्र उतार अशा आव्हानात्मक मार्गावर स्पर्धकांचा वेग पाहण्यासारखा होता. मार्गावर नवलाई नादब्रह्म ढोल पथकाने ढोल-ताशांचा गजर करत स्पर्धकांचा जोश दुणावला, तर ग्रामस्थांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून उत्साह वाढवला.
बक्षीस वितरण समारंभ हॉटेल विवेक येथे पार पडला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून टिलेज अॅग्रोचे धनंजय डबले, जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर गिम्हवणेकर, हॉटेल विवेकचे सार्थक देसाई, अॅड प्लसचे मंगेश सोनार, प्रवीण पाटील, तसेच सुवर्णसूर्य फाउंडेशनच्या संचालिका सौ. तेजा देवस्थळी उपस्थित होत्या. स्वागत रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे महेश सावंत यांनी केले. स्पर्धकांच्या सोयीसाठी बॉन अपेटाइटतर्फे पौष्टिक आहार, इनर्झालचे हायड्रेशन, अॅड प्लसचे प्रीमियम वॉटर, तर सॉर्जनचे कॉम्प्रेशन पार्टनर म्हणून सहकार्य लाभले. वाहतूक व्यवस्थेसाठी दीपक पवार, ट्रॉफीसाठी निरंजन सुर्वे, तसेच आरडीसीसी बँक, जय हनुमान मित्रमंडळ आणि ग्रामपंचायतींनी मनुष्यबळ व हायड्रेशन पॉइंटची व्यवस्था केली.
स्पर्धेत विशेष लक्षवेधी ठरला भाट्ये गावातील दिव्यांग सायकलपटू आराध्य कैलास भाटकर, ज्याने संपूर्ण अंतर निश्चित वेळेत पूर्ण करत सर्वांचे मन जिंकले. प्रेक्षकांनी उभे राहून टाळ्यांच्या गजरात आराध्यचा गौरव केला. रत्नागिरी सायकलिस्ट क्लबच्या सातत्यपूर्ण जनजागृती मोहिमेमुळे ११ ते १७ वयोगटातील मुला-मुलींमध्ये सायकलिंगबाबतची उत्सुकता वाढल्याचे दिसून आले. यंदा ८ पैकी ४ बक्षिसे रत्नागिरीतील बालस्पर्धकांनी पटकावली.
क्लबच्या सौरभ रावणांग यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून क्लबला मिळालेल्या नव्या सायकलवरून १ तास ३२ मिनिटांत अंतर पार करून उल्लेखनीय कामगिरी केली. त्याला डॉ. नितीन सनगर यांचे मार्गदर्शन लाभले. त्याच सायकलवरून रुद्र दर्शन जाधवने विभागस्तरावरही यश संपादन केले. स्पर्धकांनी रत्नागिरी सायकलिस्ट क्लबच्या आयोजनाचे आणि मार्गव्यवस्थापनाचे मनःपूर्वक कौतुक केले. आस्ताद पालखीवाला यांनी “गेल्या वर्षी पंक्चरमुळे मी बाहेर पडलो, पण यंदा प्रथम आलो,” अशी आनंदाची भावना व्यक्त केली. प्रीती गुप्ता यांनी सलग तिसऱ्या वर्षी सहभागी होत क्लबच्या सातत्यपूर्ण सुधारणा आणि महिला सायकलपटूंना दिलेल्या प्रोत्साहनाचे कौतुक केले.

