(नवी दिल्ली)
युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) १ नोव्हेंबर २०२५ पासून आधार अपडेट प्रक्रियेत मोठे बदल करत आहे. नाव, पत्ता, जन्मतारीख, मोबाइल क्रमांक किंवा ईमेल यांसारखी माहिती बदलण्यासाठी आता आधार केंद्रावर जाण्याची आवश्यकता राहणार नाही. ही सर्व कामे नागरिकांना आता घरबसल्या ऑनलाइन करता येतील.
UIDAI ने सांगितले की, नवीन प्रणाली अधिक सुरक्षित, अचूक आणि सुलभ असेल. ‘इंटिग्रेटेड व्हेरिफिकेशन सिस्टम’च्या माध्यमातून आधारमध्ये केलेले अपडेट्स आता पॅन, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, रेशन कार्ड आणि जन्म प्रमाणपत्र अशा इतर सरकारी डेटाबेसशी आपोआप जोडले जातील. यामुळे माहितीतील चुका आणि मॅन्युअल एन्ट्रीतील त्रुटी टाळल्या जातील. या नव्या प्रणालीमुळे आधार डेटा अधिक विश्वासार्ह आणि अद्ययावत राहील. तसेच नागरिकांना वारंवार कागदपत्रांच्या प्रती सादर करण्याची आवश्यकता भासणार नाही.
UIDAI ने फी स्ट्रक्चरमध्येही बदल
- नाव, पत्ता, जन्मतारीख, मोबाइल क्रमांक किंवा ईमेल अद्ययावत करण्यासाठी ₹७५ शुल्क लागेल.
- बायोमेट्रिक माहिती (फिंगरप्रिंट, आयरिस किंवा फोटो) अपडेटसाठी ₹१२५ द्यावे लागतील.
- आधार कार्ड रिप्रिंटसाठी केंद्रावर ₹७५, तर ऑनलाइन अर्जासाठी ₹४० फी ठरवली आहे.
मुलांसाठी विशेष सवलत:
५ ते ७ वर्षे आणि १५ ते १७ वर्षे वयोगटातील मुलांसाठी बायोमेट्रिक अपडेट पूर्णपणे मोफत असेल. त्यामुळे त्यांच्या वाढीच्या वयात डेटा अचूकपणे अपडेट करता येईल.
UIDAI ने स्पष्ट केले आहे की, आधार हा नागरिकत्वाचा किंवा जन्मतारखेचा पुरावा नसून केवळ ओळखीचा पुरावा आहे. एकूणच, UIDAI चे हे नवीन पाऊल ‘डिजिटल इंडिया मिशन’ला अधिक गती देणारे ठरेल. या बदलांमुळे आधार अपडेट प्रक्रिया आता अधिक सोप्या, सुरक्षित आणि पारदर्शक पद्धतीने होणार आहे.

