(रत्नागिरी /प्रतिनिधी)
महात्मा ज्योतीराव फुले शिक्षक परिषद, महाराष्ट्र राज्यतर्फे रत्नागिरीतील नामांकित सामाजिक कार्यकर्ते वाय. डी. पवार, विजय भोसले आणि विकास पेजे यांना त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक व शैक्षणिक कार्याबद्दल राज्यस्तरीय ‘समाजरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा मानाचा पुरस्कार रत्नागिरी येथील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात आयोजित दिमाखदार सोहळ्यात माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, तसेच त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. रत्नागिरीसह कोकणातील विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षणतज्ज्ञ आणि नागरीकांच्या उपस्थितीने सोहळ्याला विशेष उंची लाभली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षक परिषदेचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी वक्त्यांनी सन्मानित कार्यकर्त्यांच्या समाजभिमुख उपक्रमांचे कौतुक करताना, शिक्षणातून सामाजिक परिवर्तन घडविणाऱ्या कार्यकर्त्यांची परंपरा आजही प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन केले. ‘समाजरत्न’ पुरस्कार प्राप्त कार्यकर्त्यांनी आपल्या मनोगतात समाजसेवा हीच खरी साधना असल्याचे सांगून शिक्षक परिषदेसह सहकाऱ्यांचे आभार मानले.

