(दापोली)
तालुक्यातील साखळोळी येथे गुरुवार, २३ ऑक्टोबर, सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास दोन घरांवर वीज पडल्याने आग लागण्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत रामकृष्ण बर्वे आणि कुमार बर्वे यांच्या घरासह शेजारील चंद्रशेखर करमरकर यांच्या घराला नुकसान झाले.
डॉ. राजकुमार बर्वे यांच्या माहितीनुसार, घराच्या मीटर आणि वायरिंगवर अचानक वीज पडल्याने पेट लागला. काही क्षणांत मीटरच्या खालील खुर्ची व बेड यांनाही आग लागली, परंतु घरातील सर्व मंडळी अंगणात असल्यामुळे जीवितहानी टळली. शेजारील करमरकर यांच्या घरातील आगही तत्परतेने विझवण्यात आली, मात्र त्यांचेही काही प्रमाणात नुकसान झाले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील सुनिल सोनू तसेच उपसरपंच दिनेश भागोजी जाधव, माजी उपसरपंच अनिल विश्राम शिंदे, संदीप चंद्रकांत गोरीवले, मंगेश गोरीवले, प्रमोद बुरटे आणि इतर ग्रामस्थांनी घटना स्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. त्यांच्या त्वरित कृतीमुळे मोठ्या अनर्थाचा धोका टळला.
सुदैवाने, कोणतीही जीवितहानी झाली नाही, फक्त विशाल बर्वे यांना किरकोळ दुखापत झाली आहे. तसेच रामकृष्ण बर्वे आणि कुमार बर्वे यांच्या घरातील इलेक्ट्रिक उपकरणे व इन्व्हर्टर यांना मोठे नुकसान झाले आहे. परिसरातील इतर ग्रामस्थांनीही घटनास्थळी मदत करून आग विझवण्यास हातभार लावला.
हा प्रकार दोन दिवसांपूर्वी जालगावमध्ये वीज पडल्यामुळे नागरिकांच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नुकसान झाल्यानंतर पुन्हा एकदा वीज पडण्यामुळे दापोलीकरांसमोर पावसाच्या आणि वीज धोक्याच्या जोखमीचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे.

