(चिपळूण / प्रतिनिधी)
रत्नागिरी जिल्ह्यातील खड्डेमय रस्त्यांमुळे अपघातांची मालिका सुरूच असून, चिपळूण तालुक्यातील दहिवली खुर्द येथे रविवारी सकाळी आणखी एक गंभीर दुर्घटना घडली. गुहागर–रत्नागिरी या मार्गावर धावणाऱ्या एसटी बसमधून प्रवास करत असताना एक महिला प्रवासी आपत्कालीन दरवाजा उघडल्याने रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाली. या प्रकरणी एसटी बसचे चालक आणि वाहक यांच्याविरुद्ध सावर्डे पोलिसांनी निष्काळजीपणाचा गुन्हा नोंदवला आहे.
ही घटना रविवारी सकाळी सुमारे नऊ वाजून तीस मिनिटांच्या सुमारास दहिवली बदुक, शिवडेवाडी (ता. चिपळूण) परिसरात घडली. जखमी झालेल्या प्रवाशाचे नाव प्रियांका विनोद कुंभार (रा. दहिवली खुर्द, ता. चिपळूण) असे असून, त्यांच्या डोक्याला तसेच शरीराच्या विविध भागांवर गंभीर दुखापत झाली आहे.
या अपघाताची फिर्याद सविता सुभाष करंजेकर (वय ३९, व्यवसाय – मजुरी, रा. दहिवली खुर्द) यांनी सावर्डे पोलिस ठाण्यात दिली. फिर्यादीनुसार, फिर्यादी व जखमी प्रियांका कुंभार या दोघी दहिवली खुर्द येथील आंबाफाटा बसथांब्यावरून गुहागर-रत्नागिरी ही बस (क्रमांक एम. एच. २० बी.एल. १६८२) पकडून सावर्डे येथे प्रवास करत होत्या.
दरम्यान, बसचालक नितीन भाऊराव सावळे (गुहागर डेपो) यांनी रस्त्यावरील खड्ड्याकडे दुर्लक्ष करून बेदरकारपणे बस वेगाने चालवली. त्याचवेळी, बसचा वाहक चांद नजीर शेख यांनी आपत्कालीन दरवाजा नीट बंद आहे की नाही, याची खातरजमा न केल्याने अपघाताला कारणीभूत ठरले. बस मोठ्या खड्ड्यात आदळताच आपत्कालीन दरवाजा अचानक उघडला आणि त्या धक्क्याने प्रियांका कुंभार या रस्त्यावर फेकल्या गेल्या.
घटनेनंतर जखमी महिलेला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. पोलिसांनी या प्रकरणी चालक आणि वाहक या दोघांविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम २८९, २२५(अ), १२५(ब) आणि ९८४ अंतर्गत गु.र. क्र. १०२/२०२५ नुसार गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर पुन्हा एकदा खड्डेमय रस्ते आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे रस्त्यांच्या दुरुस्तीसह प्रवासी सुरक्षेसाठी ठोस उपाययोजनांची मागणी केली आहे.

