(साखरपा / भरत माने)
तालुक्याच्या आमसभेबद्दल आपण नेहमीच ऐकतो. कधी त्या वेळेवर होतात, कधी नाही. हजारो लोकांची गर्दी, शेकडो प्रश्न, त्यातील काही सुटतात तर काही वर्षानुवर्षे प्रलंबित राहतात. मात्र लांजा-राजापूर-साखरपा मतदारसंघात सध्या सुरू असलेला आमदार किरण सामंत यांचा झंझावाती गावभेट दौरा आगळावेगळा ठरत आहे.
आमदार किरण सामंत प्रत्येक गावात पोहोचून संबंधित अधिकारी व ग्रामस्थांच्या बैठका घेत आहेत. महसूल, ग्रामविकास, आरोग्य, शिक्षण, महावितरणसह सर्व विभागांचे अधिकारी व कर्मचारी त्यांच्या सोबत उपस्थित असतात. त्यामुळे ग्रामस्थांना प्रश्न थेट अधिकाऱ्यांसमोर मांडण्याची संधी मिळते.
या बैठकीत अनेक प्रश्न चुटकीसरशी सुटत असल्याने ग्रामस्थांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे. जिथे तालुक्याच्या आमसभेत प्रश्न प्रलंबित राहतात, तिथे आमदारांच्या ग्रामसभेत तोडगा निघत आहे.
विकास हा कधीही न संपणारा प्रवास असतो; पण आमदार किरण सामंत यांच्या नेतृत्वाखाली अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत. “ग्रामस्थांच्या समस्या सोडवणे ही माझी जबाबदारी आहे,” असे सांगत आमदार सामंत प्रत्यक्ष काम कृतीत उतरवून दाखवत आहेत, आणि त्यामुळे मतदारसंघातील सर्वसामान्यांच्या मनावर राज्य करत आहेत.

