(रत्नागिरी / प्रतिनिधी)
जिल्ह्यातील महावितरणच्या वीजग्राहकांकडे तब्बल ३५ कोटी २९ लाख रुपयांची थकबाकी असल्याचे समोर आले आहे. एकूण १ लाख २२ हजार ७७ ग्राहकांकडील ही थकबाकी असून यात शासकीय विभागांचाही समावेश आहे. त्यामुळे महावितरणसमोर वसुलीचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. जिल्ह्यात सर्वाधिक थकबाकी रत्नागिरी विभागात असून येथे ५६ हजार ५४८ ग्राहकांकडे १६ कोटी ४८ लाख रुपयांचे वीजबिल थकीत आहे. त्यापाठोपाठ खेड विभागातील ३४ हजार ८६१ ग्राहकांकडे १०.५८ कोटी तर चिपळूण विभागातील ३० हजार ६६८ ग्राहकांकडे ८.२३ कोटी रुपयांची थकबाकी आहे.
तालुकानिहाय पाहता रत्नागिरी (शहरी) विभागात सर्वाधिक थकबाकी नोंद झाली आहे. येथे १० हजार ८३१ ग्राहकांकडे ५.७० कोटी रुपयांचे वीजबिल थकीत आहे. चिपळूण (ग्रामीण) विभागातील ९ हजार ८० ग्राहकांकडे २.४७ कोटी, तर रत्नागिरी (ग्रामीण) विभागातील ८ हजार ८९१ ग्राहकांकडे ३.१९ कोटी रुपयांची थकबाकी आहे. या आकडेवारीवरून शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागांतील ग्राहकांकडे थकबाकीचा मोठा बोजा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
जिल्ह्यातील १ लाख ३ हजार ६८२ घरगुती ग्राहकांकडे १३.८३ कोटी, ११ हजार ३७ व्यावसायिक ग्राहकांकडे ४.९६ कोटी तर ९२२ औद्योगिक ग्राहकांकडे १.६७ लाख रुपयांची थकबाकी आहे. याशिवाय पथदीपांचे ९.५६ कोटी, जलव्यवस्थापनाचे ४.२४ कोटी, तसेच शासकीय कार्यालयांचे ९४ लाख रुपये थकीत आहेत. या प्रचंड थकबाकीमुळे महावितरणची आर्थिक स्थिती डळमळीत झाली असून भविष्यात वीजपुरवठ्यावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
थकबाकी वसुलीसाठी महावितरणकडून कठोर पावले उचलली जाण्याची शक्यता आहे. थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करणे, कायदेशीर कारवाई करणे अशा उपाययोजना राबवण्याचा विचार सुरू आहे. ग्राहकांनी वीजबिल भरून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरण प्रशासनाने केले आहे.

