(संगमेश्वर / एजाज पटेल)
दिवाळीची चाहूल लागल्याने संगमेश्वर शहरासह परिसरातील बाजारपेठा रंगीबेरंगी आकाशकंदिलांनी उजळून निघाल्या आहेत. यंदा देवी-देवतांची आणि महापुरुषांची छायाचित्रे असलेले फोटोफ्रेम आकाशकंदील या नव्या ट्रेंडला ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.
जय हनुमान, जय श्रीराम, जय गणेश असे जयघोष असलेले कंदील, फुलांच्या पाकळ्यांपासून ते मोरपंख आणि दिव्यांच्या झळाळीपर्यंत विविध डिझाइनमधील कंदील बाजारात पाहायला मिळत आहेत. या वैविध्यपूर्ण आणि कलात्मक कंदिलांनी संगमेश्वरची बाजारपेठ उजळून निघाली आहे.
फोटोफ्रेम कंदीलांची धूम; भक्तीभावासह सौंदर्याचा मिलाफ
यंदा दिवाळीतील सर्वात चर्चेत असलेले फोटोफ्रेम आकाशकंदील आहेत. या कंदिलांमध्ये भगवान शंकर, देवी लक्ष्मी, श्री गणेश, प्रभू श्रीराम, श्री हनुमान, श्री विठ्ठल आदींच्या छायाचित्रांसह एलईडी दिव्यांची सजावट करण्यात आली आहे. प्रकाशमान रंग आणि धार्मिक भावनांचा सुंदर संगम या कंदिलांमुळे साधला असून, ग्राहकांकडून या प्रकाराला विशेष पसंती मिळत आहे.
वारली पेंटिंग व पर्यावरणपूरक कंदीलांची वाढती मागणी
पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड देणारे वारली पेंटिंग असलेले कंदील आणि खूडन शीट, कागदी, कापडी तसेच बांबूपासून तयार करण्यात आलेले पर्यावरणपूरक कंदील या वर्षी विशेष लोकप्रिय ठरत आहेत. छोट्या आकारातील घरगुती सजावटीचे कंदील, रंगीबेरंगी पेपर लँटर्न्स, ज्यूट कंदील, तसेच “जाणत राजा” लिहिलेले कंदील ग्राहकांना भावत आहेत.
बाजारपेठा उजळल्या
संगमेश्वर शहरासह देवरुख, साखरपा, कडवई, फुणगूस आदी गावांतील बाजारपेठा या कंदिलांच्या लखलखत्या प्रकाशाने सजल्या आहेत. दुकानदारांच्या दुकानांत रंगांची उधळण झाल्याचे दृश्य पाहायला मिळत आहे.
फोल्डिंग कंदील, स्टार आकाराचे, बासरी आणि पणत्या-डिझाइनचे कंदीलही ग्राहकांना आकर्षित करत आहेत. प्लास्टिकच्या कंदिलांना मात्र या वर्षी कमी मागणी असून, हस्तनिर्मित, पर्यावरणपूरक व पारंपरिक कंदिलांना जास्त पसंती मिळत आहे.
दिवाळी सजावटीत ‘आकाशकंदील’ कायम ट्रेंडमध्ये
दिवाळी म्हटले की, दिवे आणि आकाशकंदील हे सणाचे आत्मा! दरवर्षी नावीन्यपूर्ण डिझाइन्सच्या शोधात ग्राहक उत्साहाने खरेदी करत असतात. यंदा मात्र बाजारपेठेतील ट्रेंड फोटोफ्रेम आणि वारली आर्ट कंदील असा आहे.

