(रत्नागिरी / प्रतिनिधी)
लग्नाचे आमिष दाखवून घटस्फोटीत महिलेशी शारीरिक संबंध ठेवत तिची फसवणूक केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या शादाब शौकत गोलंदाज (वय ३५, रा. मिरजोळे MIDC, रत्नागिरी) या संशयितास रत्नागिरी सत्र न्यायालयाने ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर मुक्तता दिली आहे. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवून अटक केली होती.
प्रकरणानुसार, फिर्यादी महिला २८ वर्षीय घटस्फोटीत असून, एप्रिल २०२४ मध्ये तिने एअर कंडिशनर खरेदी केला होता. यावेळी बसवणीसाठी आरोपी तिच्या घरी आला आणि त्यानंतर दोघांमध्ये ओळख झाली. या ओळखीचे रूपांतर हळूहळू प्रेमसंबंधात झाले. काही काळानंतर ते विविध ठिकाणी एकत्र राहू लागले, मात्र या काळात आरोपीने वारंवार तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले, असे तिने तक्रारीत नमूद केले आहे.
काळ जसाजसा गेला, तसतसा आरोपीचा स्वभाव चिडचिडा आणि हिंसक होत गेला. तो किरकोळ कारणांवरून पीडितेला शिवीगाळ व मारहाण करू लागला. २०२४ च्या गणपती उत्सवाच्या काळात झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर पीडिता माहेरी परत गेली आणि तिने संपूर्ण प्रकाराची माहिती आई-वडिलांना दिली. काही दिवसांनी आरोपीने पुन्हा लग्नाचे आश्वासन देत पीडितेला परत नेले, मात्र नंतर त्याने विवाह टाळला. जेव्हा पीडितेने पुन्हा माहेरी जाण्याची इच्छा व्यक्त केली, तेव्हा आरोपीने धमकी दिली की, जर तू माहेरी गेलीस, तर मी रक्ताचे सडे पाडीन. त्यानंतरही त्याने तिच्यावर अत्याचार आणि मारहाण सुरूच ठेवली.
११ सप्टेंबर २०२५ रोजी पीडिता माहेरी परत गेली आणि तिने पुन्हा पालकांना संपूर्ण त्रासाची माहिती दिली. २९ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी सुमारास आरोपी पुन्हा तिच्या घरी पोहोचला, त्यामुळे तिला जीवितास धोका असल्याची भीती वाटून तिने रत्नागिरी शहर पोलिसांत तक्रार दाखल केली. शहर पोलिसांनी या तक्रारीवरून भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६, ३५४(ब), ५०६ आणि ३५२ अंतर्गत गुन्हा नोंदवून आरोपी शादाब गोलंदाज याला अटक केली. त्यानंतर आरोपीने रत्नागिरी सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. सुनावणीदरम्यान दोन्ही पक्षांचे युक्तिवाद ऐकून न्यायालयाने ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर संशयितास मुक्तता मंजूर केली.

