(राजापूर)
शहरात गोवा बनावटीच्या दारूची अवैध वाहतूक आणि विक्री सुरू असल्याच्या तक्रारी वाढत असताना, राजापूर पोलिसांनी रविवारी बौध्दवाडी परिसरात मोठी कारवाई केली. या कारवाईत क्रेटा कारमधून वाहतूक केली जात असलेली गोवा बनावटीच्या दारूचे ६७ बॉक्स जप्त करण्यात आले. जप्त दारूची किंमत सुमारे १ लाख १५ हजार ९२० रुपये असून, सुमारे ५ लाख रुपये किमतीची क्रेटा कारही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
या प्रकरणी रोहित अंबाजी इंगळे (रा. बंगलवाडी, राजापूर) या संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती राजापूर पोलिसांनी दिली.
३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या या कारवाईमुळे पोलिसांच्या कामगिरीचे नागरिकांकडून स्वागत होत आहे. राजापूर शहर व तालुका परिसरात गोवा बनावटीच्या दारूची मोठ्या प्रमाणावर वाहतूक आणि विक्री होत असल्याच्या तक्रारी यापूर्वीही अनेकदा करण्यात आल्या होत्या. याआधीही एसटी डेपो परिसरात अशा प्रकारच्या वाहतुकीवर पोलिसांनी कारवाई केली होती. मात्र तरीही हे प्रकार सुरूच असल्याचे दिसून येत आहे.
रविवारी दुपारी बौध्दवाडी भागात दारूचे बॉक्स भरलेली कार उभी असल्याची गोपनीय माहिती राजापूर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे, दीपज्योती पाटील यांच्यासह अनिल केसकर, प्रथमेश वारिक, डिगंबर शेलार आणि वाहनचालक हर्षद मुल्ला यांच्या पथकाने दुपारी सुमारे १ वाजता धडक कारवाई केली.
या कारवाईत ६७ बॉक्स गोवा बनावटीची दारू, क्रेटा कार क्रमांक MH 05 EA 0661 असा एकूण ६ लाख १५ हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर २५२/२०२५ नुसार महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (अ)(ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

