(रत्नागिरी / वार्ताहर)
जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या वाढत्या अवैध व्यवहाराला आळा घालण्यासाठी रत्नागिरी पोलिसांनी आता ड्रग्ज तस्कर आणि विक्रेत्यांविरोधात कठोर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. तरुणपिढीला अंमली पदार्थांच्या विळख्यात जाण्यापासून रोखण्यासाठी पोलिस प्रशासनाने केवळ गुन्हे दाखल करण्यापुरती कारवाई मर्यादित न ठेवता सराईत गुन्हेगारांवर तडीपारी आणि तुरुंगवासाची कारवाई सुरू केली आहे.
या विशेष मोहिमेंतर्गत गेल्या वर्षभरात एनडीपीएस कायद्यानुसार अंमली पदार्थांच्या अवैध व्यवहारात सक्रिय असलेल्या १२ सराईत गुन्हेगारांना जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. तर अंमली पदार्थांची तस्करी, विक्री आणि पुरवठा करणाऱ्या ९ आरोपींना अटक करून त्यांची थेट तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात ड्रग्जचा अवैध व्यवसाय करणाऱ्या गुन्हेगारांमध्ये पोलिसांच्या या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.
पोलिसांची कारवाई अद्याप थांबलेली नाही. आणखी १२ आरोपींविरोधातील तडीपारीचे प्रस्ताव सध्या अंतिम टप्प्यात असून, संबंधित प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या गुन्हेगारांनाही रत्नागिरी जिल्ह्याबाहेर जावे लागणार आहे. त्यामुळे अंमली पदार्थांच्या अवैध साखळीत सक्रिय असलेल्या सराईत गुन्हेगारांवर पोलिसांनी कारवाईचा फास अधिक घट्ट केला आहे.
अंमली पदार्थांच्या सेवन करणाऱ्यांवर कारवाई करण्याबरोबरच त्यामागील मुख्य साखळी शोधण्यावर पोलिसांचा भर आहे. ड्रग्जचा पुरवठा करणारे, तस्करी करणारे आणि विक्री करणाऱ्या व्यक्तींवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यात अंमली पदार्थांचा वाढता प्रभाव निर्माण होऊ नये, यासाठी पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे.
मुख्य पुरवठादारापर्यंत पोहोचण्यात अद्याप अपयश
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची चौकशी केल्यानंतर अंमली पदार्थांचा पुरवठा मुंबई, पश्चिम महाराष्ट्र, कर्नाटक आणि बेळगावसह अन्य भागांतून होत असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या संपूर्ण साखळीतील मुख्य पुरवठादारापर्यंत पोहोचण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. त्यामुळे अंमली पदार्थांचा जिल्ह्यातील पुरवठा नेमका कुठून आणि कोणाच्या माध्यमातून होत आहे, याचा शोध घेण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.
मुख्य पुरवठादार आणि त्यामागील नेटवर्कपर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू असून, संशयितांच्या हालचालींवरही लक्ष ठेवले जात आहे. दरम्यान, वारंवार अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी होणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून तडीपारीसारख्या कठोर उपायांचा अवलंब करण्यात येत आहे.
ड्रग्ज तस्करी आणि विक्री करणाऱ्यांची गय नाही
रत्नागिरी जिल्ह्यात अंमली पदार्थांची तस्करी, विक्री किंवा पुरवठा करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीची गय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा पोलिस प्रशासनाकडून देण्यात आला आहे. अवैध अंमली पदार्थांच्या व्यवहाराची साखळी मुळापासून उखडून काढण्यासाठी कारवाई आणखी तीव्र करण्यात येणार आहे.
दरम्यान, जिल्ह्यात कुठेही अंमली पदार्थांची विक्री, तस्करी किंवा संशयास्पद हालचाली आढळल्यास नागरिकांनी तत्काळ पोलिस प्रशासनाला माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. तरुणाईला अंमली पदार्थांपासून दूर ठेवण्यासाठी पोलिसांसोबत नागरिकांनीही सहकार्य करावे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

