(मंडणगड / प्रतिनिधी)
मंडणगड तालुक्यातील पिंपळोली येथील मशिदीत अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरीची घटना घडवून सुमारे दोन लाख सत्तेचाळीस हजार रुपयांचा चांदीचा ऐवज लंपास केला आहे. या प्रकारामुळे गावात एकच खळबळ उडाली असून, पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळोली येथील मशिदीत बुधवार, दि. ८ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री ८.१५ ते गुरुवार, दि. ९ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजेदरम्यान ही चोरी झाली. पिंपळोली मुस्लिम मोहल्ला येथील रहिवासी आणि गावाचे काझी हुसेन इब्राहीम पेटकर (वय ८७) यांनी या प्रकरणी तक्रार नोंदवली आहे. अज्ञात चोरट्याने मशिदीच्या पाण्याच्या टाकीच्या खोलीचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर खोलीतील सागवानी पेटीचे कुलूप उचकटून त्यातील मौल्यवान चांदीचे दागिने आणि धार्मिक वापरातील वस्तू चोरून नेल्या.
चोरीस गेलेल्या मालामध्ये अंदाजे दीड किलो वजनाचा आणि १ लाख ५० हजार रुपयांचा चांदीचा ‘चाँद’, ४५ हजार रुपयांचे अंदाजे ३०० ग्रॅम वजनाचे चांदीचे ‘गोंडे’, ३० हजार रुपये किमतीचे २०० ग्रॅम वजनाचे तीन चांदीचे ‘गोडे’, तसेच २२ हजार रुपयांचे २०० ग्रॅम वजनाचे तीन छोटे ‘चांद-तारे’ असा एकूण ₹२,४७,००० रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे.
या घटनेची नोंद मंडणगड पोलीस ठाण्यात गु.आर. क्र. ५४/२०२५ प्रमाणे करण्यात आली असून, आरोपींविरुद्ध भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३०५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धार्मिक स्थळी झालेल्या या चोरीमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, मंडणगड पोलिसांकडून चोरट्यांचा शोध तीव्र करण्यात आला आहे.

