(मुंबई)
शैक्षणिक वर्ष २०२५-२६ च्या मुंबई विद्यापीठ अंतर्गत कोकण विभाग पुरुष व महिला बॅडमिंटन स्पर्धेत रत्नागिरी मधील गोगटे जोगळेकर कॉलेजने सलग तिसऱ्या वर्षी विजेतेपद पटकावून सुवर्ण पदक जिंकण्याची हॅट्रिक साधली आहे.
दिनांक २९ सप्टेंबर ते १ऑक्टोबर २०२५ या कालावधित मुंबई विद्यापीठ अंतर्गत कोकण झोन नं.४च्या बॅडमिंटन स्पर्धा एस.आर. एम. कॉलेज कुडाळ येथे पार पडल्या. या स्पर्धेत गोगटे जोगळेकर (स्वायत्त)च्या पुरुष व महिला बॅडमिंटन संघांनी सलग तिसऱ्या वर्षी विजेतेपदावर आपले नाव कोरून बॅडमिंटन मधले आपले वर्चस्व सिद्ध केले.
कॉलेजकडून सुवर्ण पदक विजेत्या पुरुष संघात कुमार सिद्धेश मंगेश फणसेकर, अथर्व खेडेकर, आदित्य शिर्के, अथर्व कवितके,मिहिर वाघाटे, शर्विल संसारे, शौनक भावे हे विदयार्थी सहभागी झाले होते. तर महिला बॅडमिंटन संघात कुमारी श्रुती फणसे,रिया मोरे, चार्वी कापडी, अपेक्षा राठोड, तन्वी घाणेकर, शर्वरी शिंदे, शृजेश्र्वरी आवळकर या विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या.
मुंबई विद्यापीठ राज्य संघ निवड चाचणीसाठी कुमार सिद्धेश फणसेकर, अथर्व खेडेकर, आदित्य शिर्के व कुमारी श्रुती फणसे यांची निवड झाली आहे. या दोन्हीं संघांना क्रीडा संचालक डॉ.विनोद शिंदे, क्रीडा शिक्षक कल्पेश बोटके, माधव फणसे यांचे मार्गदर्शन लाभले.
सर्व विजयी खेळाडूंचे र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पताई पटवर्धन, कार्यवाह सतीश शेवडे, जिमखाना समिती अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर केळकर, संस्थेचे संचालक, सदस्य, प्राचार्य डॉ.मकरंद साखळकर, तिन्ही उपप्राचार्य, डॉ.विवेक भिडे, सर्व प्राध्यापक, कर्मचारी, सेवक यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

