(चिपळूण)
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे प्रदेश सरचिटणीस प्रशांत यादव यांचा भाजपात प्रवेश निश्चित झाला आहे. दिनांक १९ ऑगस्ट रोजी मुंबई येथील भाजप प्रदेश कार्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण, खासदार नारायण राणे, आ. चंद्रकांत पाटील यांसह प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार असल्याची माहिती मत्स्यबंदरे विकास मंत्री ना. नितेश राणे यांनी चिपळूणमधील वाशिष्ठी डेअरी प्रकल्पात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका स्वबळावर लढवाव्यात अशी कार्यकर्त्यांची भावना असून, त्या भावना वरिष्ठांपर्यंत पोहोचवल्या जातील, असे राणे म्हणाले. “आपली खरी ताकद कधी कळणार?” असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
तसेच, २०२९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचाच आमदार असेल, असा विश्वास व्यक्त करत राणे म्हणाले की, भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रशांत यादव यांच्या पाठीशी सर्व ताकद उभी करू.

