(राजापूर / तुषार पाचलकर)
गेल्या अनेक महिन्यांपासून केवळ राजापूरच नव्हे तर संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात मोकाट गुरांचा उपद्रव वाढत आहे. या समस्येमुळे वाहतूक कोंडी, अपघातांचा धोका तसेच सार्वजनिक त्रास वाढला असून, जागरूक नागरिक, पत्रकार आणि ग्रामस्थांनी वारंवार हा विषय गांभीर्याने मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
अलीकडेच राजापूर तहसीलदार कार्यालयात आयोजित बैठकीत प्रांत अधिकारी डॉ. जस्मिन यांनी या गंभीर समस्येवर उपाययोजना करण्यासाठी काही महत्त्वपूर्ण सूचना दिल्या होत्या. त्यामध्ये विशेष ग्रामसभा आयोजित करून ग्रामस्तरीय समित्या गठीत करणे, पशुसंवर्धन विभागामार्फत गुरांचे शंभर टक्के टॅगिंग करणे आणि आवश्यकतेनुसार गुरांच्या मालकांवर कायदेशीर कारवाई करणे या मुद्द्यांचा समावेश होता. त्यांनी स्पष्ट केले की, मोकाट गुरांची समस्या ही केवळ प्रशासनाची नव्हे तर सर्वांचीच जबाबदारी आहे आणि त्यासाठी नागरिकांचे सहकार्य आवश्यक आहे.
तरीदेखील, 23 सप्टेंबर रोजी राजापूर नगरपालिकेच्या हद्दीत मुख्य रस्त्यावर, अगदी राजापूर पोलीस स्टेशन समोरच मोकाट गुरांचा वावर दिसून आला. त्यामुळे प्रशासनाने दिलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष केले जात आहे का, अशी चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे.
शहरातील वर्दळीच्या रस्त्यांवर गुरे ठाण मांडून बसल्याने वाहतूक कोंडी तर होतेच, पण अपघातांची शक्यता कायम राहते. याबाबत सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय पक्षांनी प्रशासनाकडे अनेकदा निवेदनाद्वारे मागणी केली होती. मात्र ठोस कारवाई अद्याप झालेली नाही.
सध्या मोकाट गुरांचा उपद्रव हा राजापूर तालुक्यातील प्रमुख चर्चेचा विषय ठरला असून, या समस्येबाबत राजापूर नगरपरिषद कोणती ठोस भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

