(मुंबई)
मुंबईतील १३ वर्षीय इशान अणेकरने जर्मनीत झालेल्या वर्ल्ड ट्रान्सप्लांट गेम्स २०२५ मध्ये दोन सुवर्ण आणि एक रौप्यपदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. किडनी ट्रान्सप्लांटसारख्या मोठ्या शस्त्रक्रियेनंतरही त्याने आयुष्य थांबू दिले नाही. वडिलांनी दिलेल्या किडनीमुळे मिळालेल्या या “दुसऱ्या आयुष्याला” इशानने सुवर्णमय करत भारताचा अभिमान वाढवला. आज तो आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचा सर्वात लहान वयाचा अवयव प्रत्यारोपण झालेला पदकविजेता जलतरणपटू ठरला आहे.
१६०० खेळाडूंचा सहभाग:
१७ ते २४ ऑगस्टदरम्यान जर्मनीतील ड्रेस्डेन येथे झालेल्या या स्पर्धेत जगभरातील अवयव प्रत्यारोपण झालेल्या खेळाडूंनी सहभाग घेतला. ६० हून अधिक देशांतील तब्बल १६०० स्पर्धकांनी यात भाग घेतला. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या मान्यतेने दर दोन वर्षांनी या स्पर्धा आयोजित केल्या जातात. अवयवदानाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी आणि प्रत्यारोपणानंतरही खेळांच्या माध्यमातून निरोगी जीवन जगता येते, हा संदेश देणे हा यामागचा उद्देश आहे.
या वर्षी भारतातून ४९ ट्रान्सप्लांट रिसिपियंट्स आणि ८ अवयवदाते सहभागी झाले होते. भारतीय खेळाडूंनी एकूण ६३ पदकं पटकावली — त्यात १६ सुवर्ण, २२ रौप्य आणि २५ कांस्यपदकांचा समावेश आहे. यामध्ये इशान अणेकरच्या तीन पदकांचा मोठा वाटा आहे.
इशानची पदकं:
-
१०० मीटर फ्रीस्टाईल – सुवर्ण
-
२०० मीटर फ्रीस्टाईल – सुवर्ण
-
५० मीटर बटरफ्लाय – रौप्य
फक्त इशानच नव्हे, तर त्याचे वडील अनंत अणेकर यांनीदेखील डार्ट्स आणि पेटांक या खेळांमध्ये प्रत्येकी दोन रौप्यपदकं जिंकली. अशा प्रकारे या वडील–मुलाच्या जोडगोळीने मिळून भारतासाठी एकूण पाच पदकं जिंकत स्पर्धेत झळकावलं.
दहाव्या वर्षी किडनी ट्रान्सप्लांट:
इशान हा ठाण्यातील हिरानंदानी फाऊंडेशन शाळेत नववीत शिकतो. वयाच्या केवळ दहाव्या वर्षी त्याच्यावर किडनी ट्रान्सप्लांटची मोठी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यावेळी त्याचे वडील अनंत अणेकर यांनी स्वतःची किडनी देऊन त्याला पुनर्जन्म दिला. या कठीण प्रसंगानंतरही इशानने पोहण्याचा छंद सोडला नाही. प्रशिक्षक पंकज राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली हिरानंदानी क्लब हाऊसमध्ये झालेला कठोर सराव, शिस्त आणि जिद्द यामुळेच इशानला हे आंतरराष्ट्रीय यश मिळाले, असे त्यांचे मत आहे.
जागतिक प्रत्यारोपण क्रीडा स्पर्धा (World Transplant Games):
अवयव प्रत्यारोपण झालेले खेळाडू, अवयव दान करणारे दाते आणि त्यांचे कुटुंबीय यांच्यासाठी दर दोन वर्षांनी या स्पर्धांचे आयोजन केले जाते. २०२५ मध्ये ड्रेस्डेन येथे झालेली ही स्पर्धा २५वे पर्व होते. पोहणे, धावणे, सायकलिंग यांसह अनेक खेळ प्रकारांचा यात समावेश असतो. या स्पर्धांमधून अवयवदानाविषयी जनजागृती केली जाते आणि ‘दुसरे जीवन’ मिळालेल्या खेळाडूंना आपली क्षमता जगासमोर मांडण्याची संधी मिळते.

