(जैतापूर / राजन लाड)
राजापूर तालुक्यात राष्ट्रीय महामार्गावर आणि गावागावातील रस्त्यांवर मोकाट गुरांचा वावर आता फिरती दुर्घटना ठरत आहे. अपघातांची मालिका, वाहतुकीतील गोंधळ आणि निष्पाप नागरिकांचे जीव धोक्यात आल्याने समाजात तीव्र संताप आहे.
या गंभीर प्रश्नावर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. नुकतेच त्यांनी प्रशासनाला निवेदन सादर करून मोकाट गुरांचा प्रश्न सोडवण्यासाठी ठोस कारवाईची मागणी केली होती. या निवेदनाची दखल घेत आता प्रशासन हलले असून, पंचायत समिती राजापूर (पशुसंवर्धन विभाग) यांनी ग्रामपंचायतींना व पशुपालकांना धडाकेबाज निर्देश जारी केले आहेत.
प्रशासनाची कडक भूमिका:
- प्रत्येक गुराचे Ear Tagging करून मालकाची ओळख निश्चित केली जाणार.
- रस्त्यावर भटकणारी गुरे तात्काळ पकडून सुरक्षित ठिकाणी ठेवली जाणार.
- अपघात झाल्यास गुरांच्या मालकांवर थेट गुन्हे दाखल केले जाणार.
- वाहनचालकांवर अन्यायकारक कारवाई न करता दोषी गुरांच्या मालकांनाच जबाबदार धरण्यात येणार.
प्रशासनाने वेळेत कारवाई न केल्यास आंदोलनाची तीव्र भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला आहे.
पशुपालकांना इशारा :
“आज तुम्ही गुरे मोकाट सोडली, उद्या त्याच गुरांमुळे एखाद्याचा बळी गेला, तर जबाबदार तुम्हीच ठरणार आहात. याबाबत प्रशासन सज्ज आहे, पण खरी जबाबदारी संबंधित पशुपालक व ग्रामपंचायतींवर आहे, असा इशारा पशुपालकांना देण्यात आला आहे
समाजकार्यकर्त्यांच्या दबावानंतर सुरू झालेली ही कारवाई केवळ आदेशापुरती न राहता प्रत्यक्ष अंमलात आली, तरच अपघातमुक्त आणि सुरक्षित रस्ते दिसण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. या विषयासंदर्भात आता सामाजिक कार्यकर्त्यांनी सातत्याने पाठपुरावा करण्याची भूमिका घेतली असून प्रसंगी 2 ऑक्टोंबर रोजी आंदोलन करण्याची तयारी देखील सुरू केली आहे.

