(नाशिक)
नाशिक जिल्ह्यातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर महादेव मंदिरात दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी असते, विशेषतः श्रावण महिन्यात. गर्दीच्या नियोजनासाठी आणि भाविकांना सुलभ दर्शन मिळावे म्हणून त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने ऑनलाइन दर्शन पास सुविधा सुरू केली. मात्र, या सुविधेचा गैरफायदा घेत काही समाजकंटकांनी त्याचा काळाबाजार सुरू केला, आणि आता याप्रकरणी पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
देवस्थान ट्रस्टने दोन प्रकारचे पास उपलब्ध करून दिले आहेत — एक मोफत दर्शन रांग, आणि दुसरी देणगी दर्शन रांग (प्रत्येकी २०० रुपये शुल्क). या देणगी पासपैकी २,००० पास ऑनलाइन विक्रीसाठी उपलब्ध असतात. मात्र, आरोपींनी या प्रणालीतील त्रुटींचा गैरफायदा घेत बनावट नाव, मोबाइल नंबर आणि ईमेल आयडी वापरून रोज २०० ते ३०० पास तयार करत होते. हे पास ते गरजू भाविकांना ५०० ते २,००० रुपयांपर्यंत विकत होते. यामुळे अनेक भाविकांना बनावट पासमुळे मंदिरात प्रवेश नाकारण्यात आला. पोलिस तपासात आतापर्यंत १,६४८ बनावट पास तयार केल्याचे उघड झाले आहे.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये दिलीप झोले, सुदाम बदादे (दोघेही रा. पेगलवाडी), समाधान चोथे (रा. रोकडवाडी), शिवराज आहेर (रा. त्र्यंबकेश्वर), व इतर एकाचा समावेश आहे. या टोळीने ‘डायरेक्ट खटलं’ नावाचा WhatsApp ग्रुप तयार केला होता. त्या माध्यमातून ते रोजच्या पास विक्रीची माहिती एकमेकांशी शेअर करत होते. त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे धडक कारवाई करत आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून बनावट पासेस आणि इतर पुरावे जप्त करण्यात आले आहेत.
सध्या तपास सुरु असून, या प्रकरणामागे आणखी मोठे रॅकेट आहे का, याचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, देवस्थान ट्रस्टच्या ऑनलाइन प्रणालीतील त्रुटी त्वरित सुधारण्याची मागणी भाविकांकडून होत आहे, जेणेकरून भविष्यात अशा प्रकारची फसवणूक टाळता येईल.