(चिपळूण)
तालुक्यातील शिरगाव येथे मंगळवारी (दि. २६) सकाळी बिबट्याचा एक बछडा मृत अवस्थेत आढळला. ही घटना अमोल साळुंखे यांच्या घराच्या कंपाउंडमध्ये घडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली.
घटनास्थळाची माहिती मिळताच साळुंखे यांनी तातडीने शिरगाव पोलिस ठाणे आणि वन विभागाला कळवले. चिपळूण वन विभागाचे पथक त्वरित घटनास्थळी दाखल होऊन मृत बिबट्याला ताब्यात घेण्यात आले.
प्राथमिक तपासात मोठ्या बिबट्या आणि बछड्यात झालेल्या संघर्षात बछड्याच्या मानेवर गंभीर जखम झाल्याने त्याचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वन विभागाने वर्तवला आहे. मृत बिबट्या नर जातीचा असून त्याला पुढील तपासासाठी चिपळूण येथे हलवण्यात आले आहे.

