(संगमेश्वर / एजाज पटेल)
‘सोनियाच्या ताटी, उजळल्या ज्योती, ओवाळीते भाऊराया….म्हणत आपल्या लाडक्या भाऊरायाकडून भाऊबीजेच्या दिवशी हक्काची ओवाळणी घेत भाऊबीज सण रविवारी संगमेश्वर तसलुक्यात सर्वत्र आंनदात साजरा करण्यात आला. बहिणींनी आपल्या लाडक्या भावाला विविध मिष्ठान्न बनवून भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली. भाऊबीजेचा उत्साह स्थानिक बाजारपेठेसह ऑनलाईन बाजारपेठेवर दिसून आला.
दिवाळीमधील सर्वात महत्त्वाचा आणि शेवटचा सण म्हणजे भाऊबीज. या सणामुळे हे नाते अधिकाधिक घट्ट होत जाते. बहिण- भावाच्या प्रेमाचे प्रतिक असणारी भाऊबीज रविवारी सर्वत्र उत्साहात साजरी करण्यात आली. संगमेश्वरसह फुणगूस – कोंडये खाडिभागात भाऊबीजेचा उत्साह दिसून आला. या दिवशी यम हा त्यांच्या बहिणीकडे जाऊन ओवाळून घेतो, अशी श्रद्धा असून या दिवशी अपमृत्यू पडत नाहीत असे मानले जाते त्यामुळे हिंदू संस्कृतीत भाऊबीजेच्या दिवशी भावाने बहिणीकडे जावे आणि बहिणीने भावाला ओवाळण्याची परंपरा आहे.
भावाने बहिणीच्या घरी जाताना तिला वस्त्रालंकार वगैरे देऊन तिच्या घरी भोजन करण्याची प्रथा आहे. सख्खी बहीण नसेल तर कोणत्याही बहिणीकडे जावे अशी पद्धत आहे. त्यामुळे बहीण-भावाच्या प्रेमाची देवाणघेवाण होऊन एकमेकांविषयी कृतज्ञताभाव जागृत होण्यासाठी भाऊ बहीण भाऊबीज साजरी करतात त्यामुळे रविवारी दिवसभर भाऊबीज सण मोठ्या आनंदात साजरा झाला.
तालुक्यातील मोठ्या असलेल्या संगमेश्वर तसेच देवरुख बाजारपेठेत भाऊबीजेनिमित्त मोठया प्रमाणात मोठी गर्दी होती. भाऊबीजेसाठी लागणाऱ्या भेटवस्तू खरेदीसाठी महिला वगनि खरेदीसाठी गर्दी दिसून येत होती. ज्वेलरी शॉप, कपडे, मोबाईल्स, शोभेच्या वस्तु आणि भांडी साहित्य खरेदीसाठी महिलांची प्रचंड गर्दी दिसून आली.
भाऊबीजेला रविवार आल्याने चिकन-मटनची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. पहाटेपासून ठिकठिकाणच्या चिकन-मटन शॉपमध्ये गर्दी होती. दुपारी बारा वाजेपर्यंत दुकानांसमोर रांगा लागल्या होत्या. दिवसभर बहिणींच्या घरी पोहोचण्यासाठी भाऊरायांची धावपळ सुरू होती.