(मुंबई)
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज (६ डिसेंबर ) रोजी दादरच्या चैत्यभूमीवर लाखो अनुयायांचा भीमसागर उसळला. कालपासूनच देशभरातून भीमराया अनुयायी मोठ्या संख्येने मुंबईत दाखल झाले असून आज सकाळपासून अभिवादनासाठी दीर्घ रांगा लागल्या आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तसेच अनेक मान्यवरांनी चैत्यभूमीवर उपस्थित राहून महामानवाला अभिवादन केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारकाबाबत महत्त्वाची माहिती दिली.
इंदू मिल स्मारक पुढील महापरिनिर्वाण दिनापर्यंत पूर्ण – फडणवीस
फडणवीस म्हणाले की, इंदू मिल येथे उभारले जाणारे ४५० फूट उंचीचे भव्य स्मारक पुढील ६ डिसेंबर २०२६ पूर्वी पूर्ण करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ११ ऑक्टोबर २०१५ रोजी या प्रकल्पाचे भूमिपूजन झाले होते. कामाला आता गती मिळत असून स्मारक लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात बाबासाहेबांच्या दूरदृष्टीचा उल्लेख करत एक महत्त्वाची माहिती दिली. अमेरिकेच्या न्यू जर्सी राज्याचे गव्हर्नर यांनी अलीकडेच मुंबईला भेट दिली असताना, अमेरिकेत नॅशनल ग्रीड नसल्याने वीजेची टंचाई भासते, असे त्यांनी सांगितले.
यावर फडणवीस म्हणाले, “बाबासाहेबांनी वीजमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला तेव्हाच संपूर्ण भारतासाठी राष्ट्रीय विद्युत ग्रीड तयार करण्याचा निर्णय घेतला होता. आज भारतात कोणत्याही भागातून दुसऱ्या भागात वीज सहज वाहून नेता येते. अमेरिकेलाही जो दूरदृष्टीचा विचार सुचला नाही, तो बाबासाहेबांनी दशकांपूर्वीच केला होता.”
चैत्यभूमीवर उत्साह, श्रद्धा आणि शिस्त
महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई पोलिस आणि महापालिकेने वाहतूक, वैद्यकीय सुविधा, पिण्याचे पाणी, शौचालये आणि सुरक्षा यांची विशेष व्यवस्था केली आहे. गर्दी असूनही अनुयायी शांतता आणि शिस्त राखून दर्शन घेत आहेत.

