(मुंबई)
तांत्रिक अडचणींमुळे काही काळ ठप्प असलेली मुंबई–चिपी (सिंधुदुर्ग) विमानसेवा पुन्हा सुरू होण्याच्या मार्गावर आहे. गणेशोत्सवाच्या सणापूर्वीच कोकणवासीयांना ‘बाप्पा पावला’ आहे. मात्र, या सेवेला सर्वसामान्यांच्या कक्षेत आणण्यासाठीच राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे, विमान कंपन्यांना प्रति आसन ₹3,240 व्यावहारिक तूट निधी (व्हायबिलिटी गॅप फंडिंग) देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने मंजूर केला.
हा निधी मंजूर झाल्याने उपरोक्त मार्गावरील तिकिटांचे दर लक्षणीय घटू शकतील. वास्तवात, ₹17.97 कोटींच्या निधीसाठी तयारी झाली असून, ‘उडान’ योजनेनुसार ही विमानसेवा चालवणाऱ्या कंपन्यांना प्रति प्रवाशी ₹3,240 सवलत मिळणार आहे. ही सवलत सर्व प्रवाशांपर्यंत पोहोचली पाहिजे असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी या प्रकल्पाच्या कार्यान्वयनासाठी केंद्राशी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्याचाच परिणाम म्हणजे, चिपी विमानतळाची सेवा पुन्हा सुरू करण्यास मंत्रिमंडळाकडून मान्यता मिळाली आहे. खासदार नारायण राणे यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय नागरी उड्डयनमंत्री राममोहन नायडू यांची भेट घेतली होती. या भेटीच्या दरम्यान, मुंबई-सिंधुदुर्ग-मुंबई ही महत्त्वपूर्ण विमानसेवा तातडीने सुरू करण्याची भूमिका मांडली. कोकणातील जनतेला होणारा त्रास आणि गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांची वाढती गरज लक्षात घेऊन, ही सेवा लवकरात लवकर सुरू होणे कसे महत्त्वाचे आहे, हे त्यांनी मंत्र्यांना पटवून दिले. खासदार नारायण राणे यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत, मंत्री राममोहन नायडू यांनी ही सेवा तत्काळ पूर्ववत करू असे आश्वासन दिले होते.

या निर्णयामुळे केवळ पर्यटकांसाठी नव्हे, तर स्थानिक जनतेसाठी देखील प्रवास अधिक सुलभ होईल. चाकरमानी, म्हणजेच कोकणातील रहिवासी आणि देश-विदेशातील पर्यटक यांना सोयीस्कर वेळेत प्रवास करता येणार. शिवाय, नाइट लँडिंगची समस्या देखील दूर होईल, अशी अपेक्षा पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केली. गणेशोत्सवापूर्वी ही सेवा सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत,” असे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी म्हटले आहे.
विमानसेवेमुळे व्यापारी आणि उद्योजकांना जलद कनेक्टिव्हिटी मिळेल, ज्यामुळे आर्थिक उलाढाल वाढण्यास मदत होईल. निसर्गरम्य कोकण आणि विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन स्थळांपर्यंत पोहोचणे सोपे झाल्याने, पर्यटकांची संख्या वाढेल आणि स्थानिक पर्यटन व्यवसायाला बळ मिळेल. ही विमानसेवा सुरू झाल्यामुळे कोकणच्या विकासाला आणखी चालना मिळेल,अशी आशा व्यक्त केली जात आहे.

