(माणगाव / रायगड)
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर गोरेगाव येथे मंगळवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात एका महिला डॉक्टरचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचे सहकारी गंभीर जखमी झाले आहेत.
महाडकडून पुण्याकडे वेगाने जात असलेली वॅगनर कार गोरेगावजवळ उभ्या असलेल्या कंटेनरला मागून धडकली. धडक इतकी तीव्र होती की कारचा पुढील भाग थेट कंटेनरच्या पाठीमागील चॅसिसखाली घुसून चिरडला गेला.
या अपघातात कारमधील वैद्यकीय अधिकारी डॉ. पल्लवी पळशीकर (वय 35, मूळ रहिवासी लातूर, सध्या पुणे) यांचा गंभीर डोक्याच्या दुखापतीमुळे व प्रचंड रक्तस्त्रावाने जागीच मृत्यू झाला. त्यांच्या सोबत असलेले चालक व वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल रमेश बडे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, डॉ. पळशीकर आणि डॉ. बडे हे वैद्यकीय कामानिमित्त पुण्याकडे जात होते. महाडहून मुंबईकडे (MH.४३.Y.६०५६) हा मालवाहतूक ट्रक महामार्गावर धावत असताना पाठीमागून येणाऱ्या (MH.१४.MC९८५९) या भरधाव कारची मालवाहतूक ट्रकला पाठीमागून जोराची धडक बसली. गोरेगाव पोलिस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय सुर्वे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृत व जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले.
या अपघाताची नोंद गोरेगाव पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस. एन. रासकर हे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.

