(संगमेश्वर / एजाज पटेल)
तालुक्यातील असावे बौद्धवाडी येथील सुनिल सखाराम मोहिते ह्या 59 वर्षीय इसमाने मद्यधुंद अवस्थेत सुन निकिता निकेश मोहिते हिच्याशी वाद घालून व तीला सुरीने मारण्यासाठी केलेल्या झटापटीत तिला सूरी लागून ओरखडा पडला, या वादाची तक्रार पोलीस ठाण्यात जाईल अशा भीतीने सुनिल मोहिते यांनी स्वतःच्या मानेला लोखंडी केबल गळफास लावून घेत आत्महत्त्या केल्याची घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, संगमेश्वर तालुक्यातील असावे बौद्धवाडी येथील सुनिल सखाराम मोहिते (वय वर्ष 59) हा इसम मद्य व्यसनी होता. त्याने मद्यपान करून सून सौ. निकिता निकेश मोहिते हिच्याबरोबर वाद घातला. यावेळी भाजी कापण्याची सूरी हातात घेऊन तो सुनेच्या अंगावर मारण्यासाठी धावून गेला, या झटापटीत सूरीचे टोक सौ. निकिता हिच्या गाळावर लागून ओरखडा पडला.
याची तक्रार निकेश आणि त्याची पत्नी निकिता पोलीस ठाण्यात करणार होते. या भीतीने सुनिल मोहिते याने 13 एप्रिल च्या रात्री 11.30 ते 14 एप्रिल पहाटे पहाटेच्या दरम्याने घरासमोरील पडवीतील लाकडी वाशाला लोखंडी केबल अडकवून स्वतःच्या मानेला गळफास घेत आत्महत्त्या केली.
घडलेल्या घटनेची फिर्याद निकेत सुनिल मोहिते याने संगमेश्वर पोलिसांनी दाखल केली असून संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस उप अधिक्षक शिवप्रसाद पारवे यांच्या मार्गदर्शनाखाली माखजन पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक विवेक साळवी करत आहेत.