( रत्नागिरी /प्रतिनिधी )
दुर्मिळ आणि अवैधरीत्या विक्रीसाठी आणलेली व्हेल माशाच्या उलटीची (Ambergris) सुमारे २.५ कोटी रुपये किंमतीची तस्करी उधळून लावत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एमआयडीसी परिसरात रात्री उशिरा मोठी कारवाई केली. या कारवाईत एक इसम अटकेत असून त्याच्याविरोधात वन्यजीव (संरक्षण) अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, दिनांक ०१ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री १०.४५ वाजता एमआयडीसी, रत्नागिरी परिसरात एक इसम अंबरग्रीस विक्रीसाठी येणार होता. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आले. या पथकाने परिसरात सापळा रचून छापा टाकला असता, एजाज अहमद युसूफ मिरकर (वय ४१, रा. मिरकरवाडा, सध्या रा. कोकणनगर, रत्नागिरी) हा इसम विनापरवाना अमूल्य अंबरग्रीस विक्रीसाठी आणताना आढळून आला.
या कारवाईत आरोपीच्या ताब्यातून २.५ किलो वजनाची, अंदाजे ₹२.५ कोटी रुपये किंमतीची अंबरग्रीस व ₹५० हजार रुपये किंमतीची मोटारसायकल असा एकूण ₹२,५०,५०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात गु. र. नं. १५२/२०२५ अन्वये वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ चे कलम ३९, ४२, ४३, ४४, ४८, ५१, ५७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सध्या या गुन्ह्याचा सखोल तपास सुरू असून, ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे व त्यांचे सहकारी पोउनि संदीप ओगले, पोहेकॉ विजय आंबेकर, पोहेकॉ दिपराज पाटील, पोहेकॉ विवेक रसाळ, पोहेकॉ गणेश सावंत आणि चालक पो.कॉ. अतुल कांबळे यांनी संयुक्तरित्या केली.
काळ्या बाजारात मोठी मागणी
अंबरग्रीस ही व्हेल माशाच्या आतड्यांतील स्राव असून अत्यंत दुर्मिळ व महागडी मानली जाते. ती परफ्युम्ससह काही विशिष्ट औषधांमध्ये वापरली जात असल्याने काळ्या बाजारात तिची मोठी मागणी आहे. मात्र भारतात तिचा व्यापार पूर्णतः बेकायदेशीर आहे.