(रत्नागिरी / प्रतिनिधी)
तालुक्यातील निवळी-शिंदेवाडी परिसरात १७ जुलै रोजी घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेत विजेचा धक्का बसून दोन जणांचा मृत्यू झाला. या घटनेमागे महावितरण कंपनीच्या वायरमनची गंभीर निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचे प्राथमिक अहवालातून निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी संबंधित वायरमनविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, महावितरणच्या उदासीन कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
प्राप्त माहितीनुसार, शांता वासुदेव वाडकर (वय ६३, रा. कुंभळवठार) यांनी दिलेल्या तक्रारीवरून रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, महावितरणचा वायरमन दिलीप भिकाजी मायंगडे (रा. भोके, मटवाडी) याने विद्युत खांबावरील तुटलेल्या तारेशी संबंधित कोणतीही खबरदारी न घेता ती तार विद्युत प्रवाहासह तशीच सोडून दिली. एवढेच नव्हे, तर झाडे-झुडपे तोडण्यासाठी स्वतः घटनास्थळी न जाता, शांता वाडकर यांच्या बहिणीला ‘गडी बघून झाडे तोडा’ असा सल्ला दिला.
या सूचनेनुसार, विदुलता वासुदेव वाडकर व चंद्रकांत यशवंत तांबे (रा. शिंदेवाडी) हे दोघे झाडे-झुडपे तोडत असताना तुटलेल्या तारेशी संपर्क आल्याने त्यांना जोरदार विद्युत धक्का बसला आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणाची गंभीर दखल घेत रत्नागिरी विद्युत निरीक्षण विभागाने घटनास्थळी पाहणी करून अहवाल सादर केला असून, त्यात महावितरणची थेट जबाबदारी असल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.