( रत्नागिरी/ विशेष प्रतिनिधी)
रत्नागिरी रेल्वे स्थानक परिसर प्रवाशांसाठी आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी पार्किंगचा पेचप्रसंग ठरत असताना, ट्रॅफिक पोलिस मात्र या गोंधळाचा ‘सुवर्ण’ लाभ उठवत असल्याचे चित्र स्पष्ट दिसू लागले आहे. संध्याकाळच्या वेळेस पोलिस थेट स्टेशन परिसरात हजेरी लावून गाड्यांचे फोटो काढतात आणि लगेच ‘डिजिटल’ दंडात्मक कारवाई करतात. हा प्रकार ‘वाहतूक शिस्त’ राखण्यापेक्षा दंड वसुलीचा सोपा मार्ग वाटू लागला आहे.
रत्नागिरी रेल्वे स्थानकात ‘अधिकृत’ पार्किंग शोधूनही सापडत नसल्याचे चित्र आहे. स्थानक परिसरात ठिकठिकाणी पे पार्किंगचे फलक झळकवण्यात आले आहेत. प्रवाशांची वाढती गर्दी आणि सोयीसाठी नातेवाईकांना स्टेशनपर्यंत सोडण्यासाठी गाडी आणण्याची वेळ येते, मात्र त्यासाठी गाडी नेमकी कुठे पार्क करायची? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना सतावत आहे.
स्थानक परिसराचे अलीकडेच करण्यात आलेले सुशोभीकरण हे प्रवाशांच्या सुविधेपेक्षा पैसे उकळण्याच्या यंत्रणेला चालना देणारे वाटू लागले आहे. वाहन पार्किंगसाठी अधिकृत निश्चित जागा शोधून सापडत नसल्याने प्रवासी आणि त्यांच्या सोबत आलेल्या व्यक्तींना अपुरी माहिती आणि अचानक समोर येणारे पे पार्किंगचे नियम यामुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे. अशा परिस्थितीत प्रवासी आणि त्यांचे आप्त गाडी उभी करताच, पोलिसांना हक्काची ‘केस फाईल’ मिळते. जणू काय स्टेशन परिसर हे ट्रॅफिक पोलिसांसाठी ‘दंड वसुलीचे स्पॉट’ झाले आहे.
प्रश्न असा निर्माण होतो की, नागरिकांच्या गैरसोयीमधूनच महसूल मिळवण्याची ही व्यवस्था का सुरू आहे? जबाबदार यंत्रणांनी योग्य नियोजन करणे गरजेचे असताना, गोंधळलेल्या व्यवस्थेचा गैरफायदा घेत सामान्य माणसाला ‘गुनहगार’ ठरवले जात आहे. हा प्रकार थांबवायचा असेल, तर प्रथम स्पष्ट पार्किंग जागा निश्चित कराव्यात, फलक लावावेत आणि सामान्य माणसाला गैरसमज न होता सुविधा मिळावी याची हमी प्रशासनाने द्यावी. अन्यथा, रेल्वे स्थानक हे ‘यात्रीगृह’ न राहता ‘दंडगृह’ बनून बसेल! स्थानिक प्रशासन आणि रेल्वे विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देत स्पष्ट आणि सुसज्ज पार्किंग व्यवस्था उपलब्ध करून देणे गरजेचे ठरत आहे.
अधिकृत पार्किंगचे बोर्ड लावावे….
स्थानकात सर्वच ठिकाणी पे पार्किंगचे बोर्ड लावलेले पाहायला मिळतात. मात्र अधिकृत पार्किंग व्यवस्थेचे बोर्ड कुठेच पहायला मिळत नाही, आणि उपलब्ध जागा नेमकी कोणासाठी हेही स्पष्ट नाही. सार्वजनिक सुविधांची अशी विक्री कशाच्या आधारे केली जाते? हा प्रश्न सध्या प्रलंबित आहेत. रेल्वे स्थानकात परिसरात अधिकृत पार्किंग ज्या-ज्या ठिकाणी आहे त्या सर्वच ठिकाणी मोठे अधिकृत पार्किंगचे बोर्ड लावण्यात यावे अशी मागणी जनतेमधून केली जात आहे.