(चाफे / हरेश गावडे)
रत्नागिरी तालुक्यातील चाफे येथील मोहिनी मुरारी मयेकर महाविद्यालयातील एन.एस.एस.विभागाच्या विद्यार्थ्यांनी धामणसे गावात भात लावण्याचा अतिशय अनुकरणीय उपक्रम हाती घेऊन यशस्वी केला.
चाफे मयेकर महाविद्यालयाचे विद्यार्थी विविध गावात जाऊन भात लावणी उपक्रम दरवर्षी राबवत असतात. यावर्षीही एन.एस.एस विभागाच्या विद्यार्थांना शेतीचे ज्ञान अवगत व्हावे, शेतीतून ही जनसेवा करता यावी म्हणून अशा कृती उपक्रमाचे आयोजन केले होते.
यावेळी विद्यार्थी धामणसे गावानजीक रत्नेश्वर मंदिरापासून जवळच्या जाधव यांच्या शेतात भात लावणी प्रत्यक्ष करण्यात आली. लावणीची रोपं ओढण्यापासून ते संपूर्ण लावणी लाण्यापर्यंत विद्यार्थ्यांनी सर्वच कामे आवडीने केली. जाधव यांची शेती लावताना त्यांनाही या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा चांगला हातभार लागला.
लावणी लावत असताना शेतमालकांनी खूपच समाधान व्यक्त केले
या उपक्रमाच्यावेळी शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष श्री. रोहीत मयेकर, प्राचार्या स्नेहा पालये यांनी कँपमधील विद्यार्थ्यांना धन्यवाद दिले. या एक दिवसीय भात लावणी कँपसाठी एन.एस. एस विभाग प्रमुख प्रा.सुयोग मोहिरे,सहाय्यक प्रा.तेजश्री रेवाळे, प्रा.जितेंद्र बोंबले, प्रा.हरेश गावडे यांनी विद्यार्थ्यांना प्रेरित केले.

