(रत्नागिरी)
स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेची दसरा- दिवाळी ठेव योजना दिनांक 22 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. अत्यंत आकर्षक असे व्याजदर देत, मंगलमय सणांचा आनंद घेत असतानाच गुंतवणूकदारांना गुंतवणुकीची उत्तम संधी या ठेव योजनेच्या माध्यमातून देताना मनापासून आनंद होत आहे, असे स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी सांगितले.
पतसंस्थेने आकर्षक ठेवयोजना जाहीर केली आहे. यात स्वरूपांजली ठेव योजनेत (कालावधी १२ ते १८ महिने) सर्वसाधारण व्याजदर ७.७५% आणि ज्येष्ठ नागरिक व महिलांसाठी व्याजदर ८.००% आहे. यात एकरकमी रू.५ लाख व अधिक ठेवींवर व्याजदर ८.५०% दिला जाणार आहे. सोहम ठेव योजनेत मासिक व्याज (कालावधी १९ ते ३६ महिने) सर्वसाधारण व्याजदर ८.००%, ज्येष्ठ नागरिक व महिलांसाठी ८.२५% आहे.
ठेवयोजना घोषित केली की, स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेच्या सर्वच शाखा या ठेवीदारांच्या स्वागतासाठी सज्ज होतात. एक चैतन्यपूर्ण वातावरण संपूर्ण व्यवस्थेमध्ये निर्माण होते. ठेवीदारही अत्यंत आपुलकीने आणि संपूर्ण विश्वासाने संस्थेकडे व्यवहार करण्यासाठी आतुर असतात, असे अनेक ठेवीदारांनी आवर्जून नमूद केले आहे, हा अनुभव परत परत घेताना अधिक वेगाने काम करण्याची प्रेरणा प्राप्त होते. त्यामुळे हा ठेव वृद्धीमास हा केवळ ठेव जमा करणे एवढ्याच उद्देशासाठी नसून सभासद ठेवीदारांशी संवाद साधण्याची ही एक उत्तम संधी म्हणून स्वामी स्वरूपानंद पतसंस्था या ठेव योजनांना विशेष महत्त्व देते.
स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेच्या ठेवी आता ४०० कोटीचा टप्पा पार करण्याच्या मार्गावर अग्रेसर झाल्या आहेत. आज अखेर ३७९ कोटींच्या ठेवी संस्थेकडे जमा असून २७२ कोटींचा कर्जव्यवहार संस्थेने केला आहे. संस्थेचा स्वनिधी ४७ कोटींवरून ५३ कोटीवर पोहोचला आहे. संस्थेची वसुली 99. 42 टक्के असून संस्थेच्या गुंतवणुका १६२ कोटी झाल्या आहेत. अशा उत्तम आर्थिक स्थितीसह दसरा- दिवाळी ठेव योजना जाहीर करताना विशेष आनंद होतो. प्रत्येक ठेव योजनेला ठेवीदारांचा उत्तम प्रतिसाद प्राप्त होतो. तीच परंपरा या दसरा- दिवाळी ठेव योजनेतही कायम राहील आणि दहा कोटींच्या घरात नवीन ठेवी संस्थेकडे जमा होतील असा विश्वास वाटतो, असे पतसंस्थेचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी सांगितले. जास्तीत जास्त ठेवीदारांनी स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेत ठेव ठेवावी, असे आवाहन अॅड. पटवर्धन यांनी केले आहे.

