(औरंगाबाद)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विद्यापीठाच्या उपकुलसचिव हेमलता ठाकरे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याने विद्यापीठात मोठी खळबळ उडाली आहे. झोपेच्या गोळ्यांचे मोठ्या प्रमाणात सेवन करून त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार मुलाच्या लक्षात येताच त्याने डॉ. हेमलता यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
या घटनेनंतर त्यांच्याकडून एक सुसाईड नोट सापडली असून त्यामध्ये विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय फुलारी आणि कुलसचिव प्रशांत अमृतकर यांच्यावर मानसिक छळाचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. विविध नोटीसा काढून आणि खोट्या आरोपांखाली त्यांना त्रास देण्यात आला, असा दावा त्यांनी या चिठ्ठीत स्पष्टपणे केला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात डॉ. हेमलता ठाकरे या उपकलुसचिव पदावर कार्यरत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले होते. तसेच डोक्यावर फाईल घेऊन जातानाचा त्यांचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हेमलता यांनी या गोळ्या घेताना सर्दी खोकल्याच्या गोळ्या असल्याचे कुटुंबियांना सांगितले होते. या गोळ्या त्यांच्याकडे कशा आल्या, त्या मानसिक तणावात होत्या का, चिठ्ठीत कोणाची नावे आहेत याचा संभीजनगर पोलीस तपास करत आहेत.
सुसाईड नोटमध्ये नेमकं काय?
हेमलता ठाकरे यांनी लिहिलेल्या भावनिक चिठ्ठीत त्यांनी आपल्या आई-वडिलांसह कुटुंबीयांची माफी मागितली आहे. त्या म्हणतात:
“आई, अमित, कल्पना आणि श्री… तुम्ही मला माफ कराल अशी आशा करते. जगण्याचा कंटाळा आला आहे. औरंगाबादमध्ये आल्यापासून सतत धावपळ सुरू आहे. संसार, काम आणि जबाबदाऱ्या यामुळे दमून गेले आहे. संसार करताना जितका त्रास झाला नाही, तितका त्रास ऑफिसमधून झाला. ऑफिसमधील सहकाऱ्यांकडून सातत्याने त्रास दिला जात होता. विजय फुलारी आणि प्रशांत अमृतकर या दोघांनी मला मानसिकरीत्या खचवलं. माझ्यावर ऑफिसमधील साहित्य चोरल्याचा खोटा आळ घेतला गेला आणि थेट पोलीस तक्रार दाखल करण्यात आली.
आई, बाबांनो… तुमच्या दिलेल्या संस्कारांमुळे मी कधी चुकीचं वागले नाही. पण या प्रसंगांनी मला आतून उद्ध्वस्त केलं. माझ्या श्रीची तू (आई) काळजी घे. त्याला माझी उणीव जाणवू नये याची जबाबदारी तुझ्यावर आहे. तू त्याला आपल्याजवळ ठेव, हेच माझं शेवटचं मागणं आहे.”
विद्यापीठात खळबळ, वरिष्ठांवर कारवाईची मागणी
या प्रकारामुळे विद्यापीठ प्रशासनात मोठा गदारोळ निर्माण झाला आहे. उच्चपदस्थ अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या मानसिक छळाचे हे प्रकरण अत्यंत गंभीर असून, संबंधितांवर चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विद्यापीठातील काही कर्मचाऱ्यांनी केली आहे. दरम्यान, पोलिसांकडूनही या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. हेमलता ठाकरे यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.