( संगमेश्वर )
ओव्हरटेक केल्याच्या कारणावरून रस्त्यातच गाडी अडवून तरुणाला जबर मारहाण करण्यात आल्याची घटना १ जुलै २०२५ रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास ताम्हाणे फाट्याजवळील हार्डवेअर दुकानासमोर घडली. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
याप्रकरणी तेजस विजय मोहिते (वय २५, रा. सह्याद्रीनगर, देवरुख) यांनी देवरुख पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मोहिते हे टाटा टियागो गाडीतून देवरुखहून आंबवलीकडे जात असताना त्यांच्या समोर एक रिक्षा अचानक थांबली. त्यामुळे त्यांनी ती रिक्षा ओव्हरटेक केली. मात्र, समोरून येणाऱ्या इको गाडीतून आलेल्या सूरज कृष्णा जाधव (रा. कोसुंब, फुगीचीवाडी) व त्याच्या साथीदाराने रागाच्या भरात मोहितेंना गाडीतून जबरदस्तीने ओढून रस्त्यावरच शिवीगाळ करत बेदम मारहाण केली.
दरम्यान, संशयित आरोपी दारूच्या नशेत असल्याचे सांगण्यात येते. या हल्ल्यात तेजस मोहिते यांच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली असून, कंबर, पोट व डोक्यावरही जबर मार बसला आहे. देवरुख पोलिसांनी याप्रकरणी भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ अंतर्गत कलम ११७(२), ३५२, ३२४(४), ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरु आहे.