( रत्नागिरी )
न्यायालयाने रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांतून दोन वर्षांसाठी हद्दपार केलेला स्वप्नील बाळू पाचकुडे हा बुधवार, २ जुलै रोजी रत्नागिरीत आढळून आला. त्याच्या या उपस्थितीमुळे न्यायालयीन आदेशाचे उल्लंघन झाल्याने रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे.
पाचकुडे हा दुपारी सुमारे १.३० वाजता तालुक्यातील जाकादेवी ते खालगाव दरम्यानच्या रस्त्यावर, प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ सार्वजनिक ठिकाणी फिरताना पोलिसांना दिसून आला. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस हेडकॉन्स्टेबल विनायक अनिरुद्ध राजवैद्य (वय ४६) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली. स्वप्नील पाचकुडे (रा. मावळती, पाचकुडेवाडी, करबुडे, ता. व जि. रत्नागिरी) याच्यावर उपविभागीय दंडाधिकारी, रत्नागिरी यांनी २७ डिसेंबर २०२४ रोजी हद्दपारीचा आदेश (क्रमांक : हद्दपार एसआर ०६/२०२३) काढला होता. महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ५६ (१)(अ) अंतर्गत त्याला रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांतून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले होते.
तथापि, पाचकुडेने हा आदेश धाब्यावर बसवत जाकादेवी परिसरात हजेरी लावल्याने त्याच्यावर महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम १४१ आणि १४२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास रत्नागिरी ग्रामीण पोलीस करीत आहेत.

