( रत्नागिरी / प्रतिनिधी )
जागतिक योग दिनानिमित्त रत्नागिरी पोलीस दलामार्फत आयोजित ‘योग अभ्यास व योग प्रात्यक्षिके’ कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. कोंकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्यमनगर येथील नाईक हॉलमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमात पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, तसेच विविध वरिष्ठ अधिकारी, अंमलदार आणि नागरिकांनी सहभाग घेतला. विशेष म्हणजे, पतंजली निरामय योग संस्थेच्या योगशिक्षक कीर्तीकुमार औरंगाबादकर, वीरू स्वामी आणि ३५ सदस्यीय टीमच्या मार्गदर्शनाखाली श्वसन, ध्यान आणि प्राणायामाचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.
या कार्यक्रमाला विद्यार्थी, नागरिक आणि रत्नागिरी पोलीस दलातील ३०० हून अधिक अधिकारी-अंमलदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. परिक्षेत्रीय उपअधीक्षक शिवप्रसाद पारवे यांनी उपस्थितांचे मन:पूर्वक आभार मानले.
योग म्हणजे शिस्त, समर्पण आणि संतुलित जीवन; संजय दराडे यांचे प्रतिपादन
यावेळी मार्गदर्शन करताना मा. संजय दराडे यांनी योगाला केवळ एक व्यायाम नव्हे, तर जीवनशैलीचा अविभाज्य भाग मानण्याचे आवाहन केले. “दररोज फक्त २०–३० मिनिटांचा योगाभ्यास तुमचे जीवन तणावमुक्त आणि आरोग्यदायी बनवू शकतो,” असे ते म्हणाले. त्यांनी सर्व पोलीस अंमलदारांनी योग दिनाच्या निमित्ताने मन, शरीर आणि कर्तव्य यामध्ये संतुलन साधण्याचा संकल्प करावा, असेही स्पष्ट केले.
गुन्हे आढावा बैठकीत कडक सूचना
योग दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे २० जून रोजी, विशेष पोलीस महानिरीक्षक दराडे यांनी रत्नागिरी पोलीस अधीक्षक कार्यालयात जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांची गुन्हे आढावा बैठक घेतली. गुन्हेगारी रोखण्यासाठी अधिक काटेकोर कारवाईचे निर्देशही त्यांनी दिले.