(रत्नागिरी / वार्ताहर)
तालुक्यातील केळ्ये-माजगाव येथील अफिफ इरफान खल्पे (वय २३) या तरुणाचा ओमानमधील सलाला येथे विजेचा तीव्र धक्का बसल्याने जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे केळ्ये-माजगावसह रत्नागिरी परिसरात शोककळा पसरली आहे. अफिफ हा रत्नागिरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष ताजुद्दीन खल्पे यांचा पुतण्या होता.
मिळालेल्या माहितीनुसार, अफिफ खल्पे हा रोजगाराच्या निमित्ताने दोन वर्षांपूर्वी ओमानमधील सलाला येथे गेला होता. काम पूर्ण करून तो अवघ्या एका महिन्यात आपल्या गावी परतणार होता. मात्र, मायदेशी परतण्याची प्रतीक्षा सुरू असतानाच त्याच्यावर काळाने घाला घातला. कामावर असताना त्याला अचानक विजेचा तीव्र धक्का बसला. या दुर्घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला.
अफिफच्या अकाली निधनाची बातमी समजताच कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. तरुण वयातच त्याचा मृत्यू झाल्याने नातेवाईक, मित्रपरिवार आणि परिसरातील नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
अफिफचा मृतदेह मूळ गावी आणण्यासाठी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले. आपल्या मुलाच्या मायदेशी परतण्याची वाट पाहणाऱ्या कुटुंबीयांवर या दुर्दैवी घटनेने दुःखाचा मोठा आघात झाला आहे.


