(संगमेश्वर / एजाज पटेल)
सोमवारी पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला होता. रविवारपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सोमवारी पहाटे सोनवी व शास्त्री खाडीतील पाणीपातळी धोक्याची मर्यादा ओलांडली आणि काही वेळातच रामपेठमधील आठवडा बाजार परिसर जलमय झाला. रामपेठ व गणेशआळी येथील काही दुकानांत पाणी शिरले. व्यापारी आणि नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.
या पुरपरिस्थितीत संगमेश्वर पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल सचिन कामेरकर व विनय मनवल आपत्कालीन मदतीसाठी घटनास्थळी पोहोचले होते. त्यांच्या जोडीला नावडी येथील कर्तव्यदक्ष पोलिस पाटील अंगराज कोळवणकरही पुराच्या पाण्यातून मार्ग काढत मदतकार्यात व्यस्त होते. त्यांनी नागरिकांना फक्त सतर्क राहण्याचे आवाहन केले नाही, तर दुकानदारांचा माल सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी स्वतः पुढाकार घेतला. यावेळी व्यापाऱ्यांना त्यांनी मोलाची मदत केली.
या धावपळीत कोणीतरी लक्षात आणून दिलं – आज म्हणजेच सोमवारी पोलिस पाटील कोळवणकर यांचा वाढदिवस! कर्तव्यात गुंग असलेल्या आणि चेहऱ्यावर सदैव हास्य असलेल्या कोळवणकर यांना एक खास आश्चर्य देण्याचा मनसुबा हेड कॉन्स्टेबल कामेरकर आणि मनवल यांनी रचला. त्यांनी खास दोन किलो वजनाचा केक आणून, रस्त्याच्या कडेला असलेल्या एका दुकानासमोरच वाढदिवस साजरा केला. केक पोलिस पाटील कोळवणकर यांच्या हस्ते कापण्यात आला आणि त्या गंभीर स्थितीतही काही क्षणांसाठी परिसरात गोड हास्य व समाधानाची लहर उसळली.
पावसाच्या संकटात मदतीसाठी धावलेल्या कोळवणकर यांना हा अनपेक्षित क्षण भावून गेला. वाढदिवस विसरून कर्तव्यात मग्न असलेल्या या ‘माणूस’ अधिकाऱ्याला निलेश कदम (वेदा अगरबत्ती), स्वरूप खातू, विक्रांत झगडे, राहुल कुचेकर, मोरे दुकानदार, पोलीस मित्र आकाश शेट्ये, वैभव मुरकर, आंब्रे यांच्यासह उपस्थित सर्वांनी मनापासून शुभेच्छा दिल्या.
कर्तव्यात असतानाही आपल्या सहकाऱ्याचा वाढदिवस साजरा करण्याचा कदाचित हा पहिलाच प्रसंग! पण माणुसकीच्या नात्याला अधिक बळ देणारा. संकटातही जर आपल्यात एकमेकांच्या सुख-दुःखात सामील होण्याची भावना असेल, तर जीवनातील प्रत्येक क्षण आनंददायी होतो. हेच संगमेश्वर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी कृतीतून सिद्ध केले.