(मुंबई)
महाराष्ट्रात बारावी (HSC) परीक्षा 2026 10 फेब्रुवारीपासून सुरू झाली असून, 10 फेब्रुवारी ते 18 मार्चपर्यंत राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या परीक्षांचे आयोजन करण्यात आले आहे. परंतु, पहिल्याच पेपर दिवशी मुंबईत एक दुर्दैवी घटना घडली.
18 वर्षीय सोहम सचिन कटरे (डोंबिवली) हा कळवा-मुंब्रा रेल्वे स्थानकाच्या दरम्यान लोकलमधून पडून मृत्यूमुखी पडला. सोहम बारावीच्या पहिल्या पेपरसाठी मनिषा विद्यालय, कळवा येथे जाण्यासाठी सकाळी घरातून निघाला होता.
माहितीनुसार, सकाळच्या वेळेत लोकलमध्ये प्रचंड गर्दी होती. या गर्दीमुळे त्याचा तोल गेला आणि तो चालत्या ट्रेनमधून खाली पडला. हा अपघात इतका गंभीर होता की सोहमचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली.
या घटनेमुळे कुटुंबीयांवर शोककळा पसरली असून, परिसरातील नागरिकांमध्येही हळहळ व्यक्त केली जात आहे. लोकल ट्रेनमधील गर्दी आणि प्रवासी सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मुंबईत आता एसी लोकल चालवल्या जाणार आहेत असं सांगितलं जात आहे. त्यामुळे दरवाज्यात उभे राहण्याचे, लोंबकळण्याचे प्रकार तरी बंद होतील, पण त्याची अजूनही प्रतिक्षाच आहे.

