(रत्नागिरी)
श्रीमती विमल शंकर पेडणेकर (वय ८५, रा. खेडशी नाका, रत्नागिरी) यांचे मरणोत्तर देहदान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रत्नागिरी येथे करण्यात आले. हे महाविद्यालयातील सातवे देहदान ठरले आहे.
श्रीमती पेडणेकर यांचे दिनांक २५ जून २०२५ रोजी सायंकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, रत्नागिरीच्या अतिदक्षता विभागात उपचार घेत होत्या.
निधनानंतर त्यांच्या कन्या श्रीमती माधवी मधुकर नाखरेकर यांनी आईचा देह वैद्यकीय शिक्षण व संशोधनासाठी दान करण्याचा निर्णय घेतला. या पुण्यकार्याला त्यांच्या कन्या सौ. मंजिरी नाखरेकर, नातू-जावई सुहास पालेकर, सागर भिंगारे यांचे तसेच रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
देहदानाची ही संपूर्ण प्रक्रिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनोद सांगवीकर, शरीररचनाशास्त्र विभागप्रमुख डॉ. सादिकअली सय्यद, डॉ. योगिता कांबळे, वैद्यकीय समाजसेवा अधीक्षक श्री. रेशम जाधव, तसेच विभागातील कर्मचारी – पूर्वा तोडणकर, भूमी पारकर, मिथिलेश मुरकर व मिहिर लोंढे यांनी संयोजन व व्यवस्थापनाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.
श्रीमती विमल पेडणेकर यांचे हे उदात्त योगदान वैद्यकीय शिक्षणासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. त्यांच्या कुटुंबीयांचे हे समाजासाठी दिलेले योगदान सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.