(उरण)
रायगड जिल्ह्यातील उरण द्रोणागिरी नोड येथील पागोटे ग्रामपंचायत हद्दीतील सीडब्ल्यूसी (बजेट) या माल हाताळणी करणाऱ्या गोदामाला मंगळवारी (दि. १३) रात्री १०.३० च्या सुमारास आग लागण्याची घटना घडली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गोदाम व्यवस्थापनाच्या हलगर्जीपणामुळे व सुरू असलेल्या वेल्डिंगच्या कामातून ही आग लागली.
या घटनेची माहिती मिळताच सिडको आणि जेएनपीटी बंदराच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आग नियंत्रणात आणली. जवानांच्या वेळेवर आणि धाडसी प्रयत्नांमुळे मोठा अनर्थ टळला. सुदैवाने, गोदामात उपस्थित असलेल्या कामगारांच्या सतर्कतेमुळे त्यांचा जीव वाचला, अशी माहिती कामगारांनी दिली आहे. दरम्यान, गोदामात मोठ्या प्रमाणावर ‘हजार ड्रॅम’सह ज्वलनशील रसायनेही साठवलेली होती. आग जर त्या भागात पसरली असती, तर पागोटे गावातील रहिवाशांनाही त्याचा मोठा फटका बसला असता, अशी भीती स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.
उरण तालुक्यात अनेक ग्रामपंचायत हद्दीत माल हाताळणी करणारी गोदामं असून, त्यामध्ये अग्निशमन सुरक्षा व्यवस्थेचा अभाव प्रकर्षाने जाणवतो. उरण तहसील, स्थानिक पंचायत समिती, सिडको, प्रदूषण नियंत्रण मंडळ, सीमाशुल्क विभाग व जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडून योग्य ते लक्ष न दिल्याने वारंवार अशा धोकादायक घटना घडत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. या पार्श्वभूमीवर उरणमधील सुरक्षिततेच्या दृष्टीने ठोस उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे असून, स्थानिक प्रशासन, पोलीस यंत्रणा तसेच संबंधित विभागांनी तात्काळ पावले उचलावीत, अशी जोरदार मागणी रहिवाशांकडून केली जात आहे.