(चिपळूण)
मुंबई-गोवा महामार्गावरील बहादूरशेखनाका येथे मंगळवारी सकाळी ११.३० वाजता घडलेल्या दुहेरी धडकेत कारचे मोठे नुकसान झाले असून, या प्रकरणी ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातानंतर ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती, ज्यामुळे वाहतूक पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कंबर कसावी लागली.
कोल्हापूरहून माणगावकडे निघालेला १४ चाकी ट्रक बहादूरशेखनाका येथे वळवत असताना त्याने समोरून जाणाऱ्या कारला जोरदार धडक दिली. याचवेळी नगरपरिषदेची कचरा वाहतूक करणारी गाडी (चालक सचिन कामेरकर, खंडचौकी) ही दुसऱ्या बाजूने येत होती. तिनेही कारला धडक दिली. या अपघातात कारचे दोन्ही बाजूचे दरवाजे, आरसे व अन्य भागाचे मोठे नुकसान झाले.
कारचालक दत्ताराम गणवत वाघे (वय ६२, रा. निर्व्हळ, चिपळूण) यांनी याबाबत दिलेल्या तक्रारीवरून ट्रकचालक शेरसिंग कल्याणसिंग खैरय्या (वय ३०, रा. अमरावत रायशेर, मध्यप्रदेश) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गासह गुहागर-विजापूर मार्गावर दीर्घकाळ वाहतूक ठप्प झाली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाले. पोलिसांनी तत्परता दाखवत वाहतूक सुरळीत केली.
या प्रकारामुळे महामार्गावरील वाहतूक सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाला असून, मोठ्या वाहनांच्या अनियमित वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याची गरज अधोरेखित झाली आहे.