(दापोली)
दापोली तालुक्यातील हर्णे बायपास रोडवर बुधवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास बोलेरो पिकअप आणि स्कोडा रॅपिड यांच्यात भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत स्कोडा कारमधील चार प्रवासी गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
आकाश अशोक चव्हाण (वय १९, रा. मुरुड, ता. दापोली) हे महिंद्रा बोलेरो पिकअप (क्र. एम.एच.०६ बी.डब्ल्यू. ५१६०) भरधाव वेगाने चालवत होते. हर्णे बायपासवरील अगस्त्य हॉटेलजवळ त्यांनी समोरून येणाऱ्या स्कोडा रॅपिड (क्र. एम.एच.०२ सी.पी. ७३५९) या वाहनाला जोरदार धडक दिली. स्कोडा रॅपिड चालवत असलेल्या श्रुती लक्ष्मण कमठेकर (वय २८, रा. मीरा रोड, ठाणे) यांच्यासोबत वाहनात आणखी तीन प्रवासी होते.
या अपघातात श्रुती कमठेकर, नील शिरवाडकर (वय १७, रा. नवी मुंबई), अदिती जय नागवेकर (वय १५, रा. श्रीवर्धन, रायगड) आणि जुही नागवेकर (वय २२, रा. श्रीवर्धन, रायगड) हे सर्वजण गंभीर जखमी झाले. अपघातानंतर त्यांना तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले.
घटनेची नोंद हर्णे सागरी पोलीस ठाण्यात ११ जून रोजी सायंकाळी ७.३७ वाजता करण्यात आली. बोलेरो चालक आकाश चव्हाण याच्याविरोधात निष्काळजीपणे वाहन चालवल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हर्णे सागरी पोलीस करत आहेत.