(श्रीनगर)
काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगामच्या बैसरन खोऱ्यात दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या भीषण हल्ल्यात 27 जणांचा मृत्यू झाला. तर 20 जण जखमी झाले आहेत. मृतांची संख्या वाढण्याची भीती आहे. पाच ते सहा दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांची नावे आणि धर्म विचारून त्यांच्यावर गोळीबार केला. दरम्यान, महाराष्ट्रातील दिलीप डिसले व अतुल मोने या दोन पर्यटकांचा मृत्यू झाला आहे.
जम्मू-काश्मीरच्या अति-पर्यटन स्थळांपैकी एक असलेल्या पहलगाममध्ये मंगळवारी दुपारी भीषण दहशतवादी हल्ला झाला. द रेसिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या हल्ल्यात किमान २७ पेक्षा अधिक पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र आणि पुण्यातील पर्यटकांवर देखील हल्ला झाला असून पुण्यातील कर्वेनगरमधील दोन कुटुंबातील पुरुषांना गोळ्या लागल्या आहेत. दरम्यान, पुणे आणि महाराष्ट्रातील पर्यटकांचे नातेवाईक प्रचंड काळजीत पडले असून आपापल्या कुटुंबियांशी संपर्क साधण्याचे आटोकाट प्रयत्न सुरू होते.
जम्मू काश्मीरच्या पेहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हा हल्ला केला. या अनेक जण जखमी झाले आहेत. आसावरी जगदाळे, प्रगती जगदाळे, संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गनबोटे, संगीता गनबोटे यांच्यावर हा हल्ला झाला आहे. ही कुटुंब मुळची बारामती तालुक्यातील असून सध्या पुण्यात कर्वेनगरमध्ये वेदान्त नगरीजवळ राहात असल्याची प्राथमिक माहिती आहे. यातील संतोष आणि कौस्तुभ यांना गोळ्या लागल्या आहेत. यातील एकाच्या अंगात तीन गोळ्या घुसल्या आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हा हल्ला झाल्यानंतर सुरक्षा दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर हल्ला झालेल्या संपूर्ण भागाची नाकेबंदी करण्यात आली आहे. या हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्या बरोबर फोनवरून संभाषण झाले. शाह हे तातडीने श्रीनगरला रवाना झाले आहेत.
हल्ला दुपारी १२ वाजेच्या सुमारास ‘बैसारन’ नावाच्या हिरव्यागार कुरणाजवळ झाला. येथे देशाच्या विविध भागांतील पर्यटक फिरण्यासाठी आले होते. अचानक अज्ञात बंदूकधाऱ्यांनी पर्यटकांवर बेधुंद गोळीबार सुरू केला. आधी पर्यटकांना नाव आणि धर्म विचारण्यात आले. त्यानंतर त्यांना गोळ्या घालण्यात आल्याचे प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले. गोळ्यांच्या आवाजाने परिसरात एकच गोंधळ उडाला आणि लोकांनी पळापळ सुरू केली. जखमींना तात्काळ अनंतनाग व श्रीनगर येथील रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सुरक्षा दलांनी परिसर सील करून शोधमोहीम सुरू केली आहे.
मृतांमध्ये काही पर्यटक गुजरात सूरतमधील आहेत. तर, उर्वरित पर्यटक हरियाणा आणि दिल्ली येथून आले होते, असे पोलीस यंत्रणांकडून सांगण्यात आले. जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त केला आहे आणि जखमींना शक्य तेवढी वैद्यकीय मदत देण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तातडीने जम्मू काश्मीरला रवाना झाले आहेत. सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील शाह यांच्याशी फोनवर चर्चा करून तात्काळ पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.
पहलगाम हे दक्षिण काश्मीरचे अतिश सुंदर ठिकाण आहे. इथं मोठ्या प्रमाणात पर्यटक देशभरातून येत असतात. दरम्यान या हल्ल्यानंतर इथं येणाऱ्या पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. या हल्ल्यानंतर पर्यटकांमध्ये भितीचे वातावरण आहे. या हल्ल्याचा जम्मू कश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निषेध केला आहे. दरम्यान, बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एक्सवर पोस्ट करीत ओमर अब्दुल्ला यांना याविषयी आवश्यक असलेली सर्वतोपरी मदत करण्याचे आवाहन केले.
पुण्याच्या जखमी संतोष जगदाळे यांंची लेक आसावरी जगदाळे ने सांगितला थरारक प्रसंग
पहेलगाम दहशतवादी हल्ल्यामधील अंगावर काटा आणणार्या गोष्टी आता समोर येत आहेत. या हल्ल्यामध्ये 54 वर्षीय संतोष जगदाळे देखील जखमी झाले आहेत. त्यांच्यावर 3 गोळ्या झाडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. PTI शी बोलताना संतोष यांच्या 26 वर्षांच्या मुलीने, आसावरी जगदाळेने सारा प्रसंग सांगितला आहे. ती म्हणाली, मिनी स्वित्झर्लंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेताब व्हॅलीमध्ये आम्ही फिरायला गेलो होतो. तिकडे घोड्यांवरून जावे लागते. दुपारी आम्ही तिकडे जायला निघालेलो असताना वाटेतच दहशतवाद्यांनी माझ्या वडिलांना आमच्या डोळ्यासमोर गोळ्या घातल्या. हल्ला झाला तेव्हा गोळ्यांचा आवाज ऐकून ते एका झोपडीत लपले होते. हल्लेखोर तेथे आला. त्याने संतोष यांना इस्लामिक मंत्र म्हणायला सांगितले. मात्र संतोष ते बोलू न शकल्याने त्यांच्या डोक्यात आणि कानामागून, पाठीत अशा 3 गोळ्या झाडल्या. संतोष जगदाळे हे पुण्यात व्यावसायिक आहेत. संतोष जगदाळे खाली पडल्यानंतर त्यांच्या भावावरही हल्ला केला. दरम्यान आसावरीला अद्याप तिचे वडील आणि काका जिवित आहेत की मृत हे ठाऊक नाही. आसावरीच्या माहितीनुसार ते 5 जण एकत्र होते. मिनी स्वित्झर्लंड म्हणून ओळखल्या जाणार्या पहलगामजवळील बैसरन व्हॅलीमध्ये ते आले होते.
तुम्हें नहीं मारेंगे, जाओ मोदी को बता दो…
पाकिस्तानस्थित दहशतवादी गट लष्कर-ए-तैयबाची स्थानिक शाखा असलेल्या रेझिस्टन्स फ्रंटने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या हल्ल्यातील मृत्यूच्या वेगवेगळ्या ह्दयद्रावक गोष्टी समोर येत आहे. कर्नाटकातील व्यापारी मंजुनाथ राव हे पत्नीसाठी जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेले होते. हल्ल्यात मंजुनाथ राव यांचा मृत्यू झाला आहे. यात मंजुनाथ राव यांची पत्नी व दहशतवाद्यामध्ये संवाद झाला आहे.
मंजुनाथ यांचा मृत्यू झाल्यानंतर पत्नीने दहशतवाद्यांना तिला मारण्याची विनंती केली. परंतु दहशतवाद्यांनी नकार दिला. एका टीव्ही चॅनेलशी बोलताना पल्लवी म्हणाली, “मी दहशतवाद्यांना सांगितले की त्यांनी माझ्या पतीला मारले, मलाही मारून टाका. यावर दहशतवादी म्हणाले, आम्ही तुम्हाला मारणार नाही, जाऊन मोदींना हे सांगा. मंजुनाथ हा कर्नाटकातील शिवमोग्गा येथील रहिवासी होता. कर्नाटकातील जोडप्याचा शेवटचा व्हिडिओही समोर आला आहे जो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याच्या पत्नीसोबतचा शेवटचा व्हिडिओही समोर आला आहे. तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हा व्हिडिओ श्रीनगरमधील दाल सरोवराचा आहे. यामध्ये, कर्नाटकातील व्यापारी मंजुनाथ व पत्नी काश्मीरच्या त्यांच्या भेटीबद्दल सांगत आहेत. मंजुनाथने हा व्हिडिओ प्रवासाचा अनुभव म्हणून बनवला आहे. यामध्ये, मंजुनाथ काजल मॅम नावाच्या व्यक्तीचेही छान सहल आणि व्यवस्थेबद्दल आभार मानत आहेत.
पंतप्रधानांकडून हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध
पंतप्रधान मोदी यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये मोदी म्हणाले की, “जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांच्याप्रती मी संवेदना व्यक्त करतो. जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी मी प्रार्थना करतो. पीडितांना सर्वतोपरी मदत केली जात आहे. या घृणास्पद कृत्यामागील लोकांना सोडले जाणार नाही! त्यांचा दुष्ट अजेंडा कधीही यशस्वी होणार नाही. दहशतवादाविरुद्ध लढण्याचा आमचा निर्धार अढळ आहे आणि तो आणखी मजबूत होईल.”