(मुंबई)
विधानसभा निवडणूक २०२४ पूर्वी महायुती सरकारने सुरू केलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना निवडणुकीत निर्णायक भूमिका बजावली. या योजनेमुळे लाडक्या बहिणींनी महायुतीला मोठा विजय मिळवून दिला. आता या योजनेतून लाभलेल्यांसाठी राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून आर्थिकदृष्ट्या सबलीकृत महिलांच्या सक्षमीकरणासाठी महिला नागरी सहकारी पतसंस्था स्थापन करून त्यांना बचत, गुंतवणूक व स्वयंरोजगारासाठी नवीन संधी उपलब्ध करून दिल्या जातील, अशी माहिती सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली.
सहकारमंत्री पाटील म्हणाले की, शासनाच्या ८ मार्च २०१९ च्या परिपत्रकानुसार या पतसंस्थांच्या नोंदणीसाठी निकष निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये विविध क्षेत्रांनुसार प्राथमिक सभासदांची किमान संख्या, भागभांडवल आणि नोंदणीसाठी आवश्यक अटी निश्चित करण्यात आल्या आहेत.
उदाहरणार्थ,
-
मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील वार्ड प्रभागासाठी १००० सभासद, भागभांडवल १५ लाख रुपये,
-
महानगरपालिका क्षेत्रासाठी २००० सभासद, भागभांडवल ३० लाख रुपये,
-
नगरपालिका क्षेत्रासाठी ५०० सभासद, भागभांडवल ५ लाख रुपये याप्रमाणे निकष आहेत.
गाव, तालुका आणि जिल्हास्तरावरही यासाठी वेगवेगळ्या सभासद संख्यांवर आणि भागभांडवलावर नियम आखण्यात आले आहेत, जे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० आणि त्याखालील नियम १९६१ नुसार अंमलात आणले जातील.
नोंदणी करताना लाभार्थी महिलांची यादी महिला व बालविकास विभागाकडून प्रमाणित करणे आवश्यक आहे. तसेच, प्रवर्तकांची पार्श्वभूमी तपासून गुन्हेगारी अभिलेख नसल्याचे पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याकडून प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. त्याशिवाय, प्रवर्तकांनी ग्राहकांचे संपूर्ण KYC पूर्ण करण्याचे, सावकारी किंवा तत्सम व्यवसाय न करण्याचे, थकबाकी नसल्याचे व इतर सहकारी संस्थांमध्ये संचालक नसल्याचे प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक आहे. नियमांचे पालन न करणाऱ्या संस्थांची नोंदणी होणार नाही. प्रत्येक नोंदणीकृत पतसंस्थेसाठी सहकार विभागाकडून सहाय्यक निबंधक दर्जाचा ‘पालक अधिकारी’ नेमण्यात येईल, जो हिशोब लेखन, ठेवी-कर्ज व्यवहार, सभा इतिवृत्त, लेखापरीक्षण आणि कायदेशीर मदत करेल.
सहकारमंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविला जात आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतून आर्थिक मदत मिळालेल्या महिलांना या पतसंस्थांच्या माध्यमातून बचत, गुंतवणूक व स्वयंरोजगारासाठी नवे मार्ग खुले होतील. ग्रामीण व शहरी भागातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी हा मोठा टप्पा ठरेल, असा विश्वास मंत्री पाटील यांनी व्यक्त केला.