(संगमेश्वर / सुरेश सप्रे)
कसबा संगमेश्वर येथील छत्रपती संभाजी महाराज स्मारक येथील रोहित्र स्ट्रक्चर अन्य ठिकाणी हलविण्याच्या कामाला येत्या दोन दिवसात सुरू होणार आहे. कसबा येथील छत्रपती संभाजी महाराज स्मारक येथे १०० केव्हीए आणि २०० केव्हीए रोहित्रे उभी होती. मात्र त्यामुळे स्मारकाजवळ अडचण निर्माण होत असल्याने ती हलवण्याची मागणी स्थानिकांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनी आयोजित कार्यक्रमात कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांच्याकडे केली होती.
माजी केंद्रीय मंत्री रत्नागिरी सिंधदुर्गचे खा. नारायणराव राणे यांनी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निधी मंजुरीसाठी पत्र दिले. यानुसार रत्नागिरीच्या जिल्हा वार्षिक योजनेमध्ये या रोहित्र स्ट्रक्चर स्थलांतरणासाठी २२ लाख ६९ हजार ९६८ रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला होता. याबाबतची कार्यवाही लवकरात लवकर करावी अशा सूचना खा. नारायण राणे यांनी जिल्हाधिकारी याना दिल्या होत्या. त्यानुसार या कामाला निधी मंजूर झाला असून महावितरणकडे तो वर्ग झाला असून येत्या दोन दिवसात ही रोहित्रे हलवण्यात येणार आहेत. गतिमानतेने झालेल्या कामाबद्दल आमदार निलेश राणे आणि खासदार नारायणराव राणे यांचे आभार मानले आहेत.