(रत्नागिरी)
एक वर्षाच्या बाळाची शस्त्रक्रिया करण्यापूर्वी बाळाचा रक्तगट अतीदुर्मिळ बॉम्बे रक्त गट असल्याचे समजले. आई-वडील नातेवाईक चिंतेत असताना रत्नागिरी जिल्हातील दापोली-आंजर्ले येथील बॉम्बे रक्तगट असलेल्या ओंकार शरद धनावडे या युवकाने एकवर्षीय बाळाला रक्तदान करून बाळासाठी देवदूत ठरला आहे.
कर्नाटकच्या विजापूर जिल्ह्यातील बबलेश्वर येथील एक वर्षीय बाळावर शस्त्रक्रिया करायची होती. शस्त्रक्रियेपूर्वी बाळाच्या रक्तगटाची चाचणी केली तेव्हा बाळाचा बॉम्बे रक्तगट असल्याचे आढळले. या गटाचे रक्त मिळणार नाही, अशी स्थिती असल्याने चिंताग्रस्त पालकांना दापोली आणि सांगलीतील या अती दुर्मिळ रक्तगटातील रक्तदात्यांनी या बाळाला जीवदान दिले.
ओंकार हा रत्नागिरी जिल्हातील एकमेव बॉम्बे रक्तगटाचा दाता आहे. बॉम्बे रक्तगट हा देशातील दुर्मिळ असा रक्तगट आहे. या रक्तगटाचे भारतामध्ये 180 दाते आहेत तर जगामध्ये 540 दाते आहेत. 1952 साली एस. एम. भेंडे यांनी या रक्त गटाचा शोध लावला. मुंबईत शोध लागला म्हणून या रक्तगटाला बॉम्बे रक्तगट असे नाव देण्यात आले आहे. या गटाचा सरासरी दहा लाखात एक रक्तदाता सापडतो.
चार वर्षांपूर्वी ओंकारने आंजर्वेतील रक्तदान शिबिरात ओ पॉझिटिव्ह रक्तगट म्हणून रक्तदान केले होते. या वेळी मुंबई हॉस्पिटलची टीम रक्तसंकलन करण्यासाठी आली होती. यावेळी ओंकारचा रक्त गट हा बॉम्बे ग्रुपचा आहे, असे सांगण्यात आले. बाँबे रक्तगट हा सामान्य चाचणीने ओळखता येत नाही. हा दुर्मीळ असल्याने तो अधिक काळ सुरक्षित ठेवावा लागतो. या गटाचे रक्त अत्यंत कमी तापमानात ठेवावे लागते. या रक्तगटाचे सर्वाधिक लोक मुंबईत असल्याचे म्हटले जाते.