(खेड)
उत्तर रत्नागिरी जिल्ह्यात खेड, दापोली व मंडणगड या तीन तालुक्यांत महावितरणची १ कोटी ७७ लाख रुपयांची वीजबिले थकली असल्याची माहिती महावितरणचे कार्यकारी अभियंता प्रमोद बाबरेकर यांनी दिली. ही थकीत वीजबिले वसूल करण्यासाठी तीनही तालुक्यांमध्ये वीज कर्मचाऱ्यांची पथके तैनात करण्यात आली असून, वीजबिले भरणा करण्यास कुचराई करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत.
घरगुती, औद्योगिक, व्यापारी व इतर संवर्गातील १ कोटी ७७ लाख रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये दापोली उपविभाग १ मध्ये ४२ लाख तर २ मध्ये ३६ लाख, खेड उपविभागात ४२ लाख, लोटे उपविभागात २८ लाख तर मंडणगड उपविभागात २९ लाख रुपयांची थकबाकी आहे. ही थकीत रक्कम वसुलीसाठी तीनही तालुक्यांत पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पाठोपाठ तीनही तालुक्यातील शासकीय कार्यालयांची २ कोटीहून अधिक रुपयांची बिले थकली आहेत.
शासकीय कार्यालये मार्च अखेरीसपर्यंत वीजबिले भरणा करण्याच्या दृष्टीने प्राधान्य देत असतात. यामुळे शासकीय कार्यालयातील थकबाकी मार्चअखेरपर्यंत पूर्णपणे वसूल करण्यास यश येईल, असे कार्यकारी अभियंता प्रमोद बाबरेकर यांनी सांगितले. ज्या ग्राहकांची वीजबिले थकली आहेत. त्या ग्राहकांनी तातडीने वीजबिले भरणा करून कारवाई टाळण्याच्या दृष्टीने लक्ष द्यावे, असे आवाहनही महावितरण प्रशासनाने केले आहे.