(पुणे)
पाण्याच्या टिकाऊ वापरासाठी आयुष्यभर झटणाऱ्या भारतातील अग्रगण्य भूजलतज्ज्ञ डॉ. हिमांशू कुलकर्णी यांना अमेरिकेच्या ओक्लाहोमा विद्यापीठाच्या वॉटर सेंटरकडून प्रतिष्ठेचा ‘आंतरराष्ट्रीय जल पुरस्कार’ प्रदान करण्यात आला आहे. जागतिक स्तरावर पाणीपुरवठा आणि स्वच्छता क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना दोन वर्षांतून एकदा दिला जाणारा हा पुरस्कार मिळवणारे पुण्यातील डॉ. कुलकर्णी भारतीय उपखंडातील पहिले शास्त्रज्ञ ठरले आहेत.
या पुरस्काराचे वितरण सोहळा १५ सप्टेंबर २०२५ रोजी अमेरिकेत पार पडला. डॉ. कुलकर्णींना ट्रॉफी आणि २५ हजार अमेरिकन डॉलर्स (सुमारे २२ लाख रुपये) रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले. २००९ पासून सुरु झालेल्या या पुरस्काराद्वारे विकसनशील देशांतील गरिबी रेषेखालील लोकांसाठी पाणी व्यवस्थापन, स्वच्छता, संशोधन, अध्यापन आणि सामाजिक सेवेत योगदान देणाऱ्यांना सन्मानित केले जाते.
डॉ. हिमांशू कुलकर्णी गेल्या तीन दशकांपासून भूजल व्यवस्थापन आणि त्यासोबत जोडलेल्या सामाजिक, शैक्षणिक व धोरणात्मक क्षेत्रात कार्यरत आहेत. ते पुण्यातील ‘अॅक्वाडाम’ (Advanced Center for Water Resources Development and Management) या संस्थेचे संस्थापक विश्वस्त आणि सचिव आहेत. या संस्थेच्या माध्यमातून देशभरात भूजल संवर्धनासाठी संशोधन आणि समुदाय भागीदारी उपक्रम राबवले जातात.
मोलाचे योगदान
डॉ. कुलकर्णी नीति आयोगाच्या १२ व्या योजनेच्या कार्यगटाचे सह-अध्यक्ष होते आणि राष्ट्रीय जलचर मॅपिंग कार्यक्रमाच्या मसुदा तयार करण्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. तसेच ते सध्या शिव नाडर इन्स्टिट्यूट ऑफ एमिनेन्स येथे ग्रामीण व्यवस्थापन विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.
या सन्मानाबद्दल प्रतिक्रिया देताना डॉ. कुलकर्णी म्हणाले, “हा पुरस्कार वैयक्तिक सन्मान नसून अॅक्वाडाम आणि त्याच्याशी निगडित संस्थांनी भूजल व्यवस्थापनासाठी केलेल्या एकत्रित प्रयत्नांचा गौरव आहे. भारतातील भूजल संकटावर मात करण्यासाठी एकात्मिक भूजल व्यवस्थापन ही काळाची गरज आहे.”
डॉ. कुलकर्णी यांच्या या यशामुळे भारतातील जलविज्ञान क्षेत्रातील संशोधकांसाठी एक नवा आदर्श निर्माण झाला आहे. त्यांच्या कार्यामुळे केवळ भूजल संवर्धनाची व्याप्ती वाढली नाही, तर स्थानिक समुदायांमध्ये पाण्याच्या साक्षरतेबाबतही जागरूकता निर्माण झाली आहे. भारताला भेडसावणाऱ्या भूजल संकटाच्या पार्श्वभूमीवर, डॉ. कुलकर्णी यांचे कार्य आणि हा आंतरराष्ट्रीय सन्मान भविष्यातील जलनीती ठरवताना मार्गदर्शक ठरेल, अशी आशा आहे.

