(दापोली)
तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी गेल्या १५ वर्षांपासून अपूर्ण राहिलेलं स्वप्न अखेर साकार होण्याच्या मार्गावर आहे. सातेरे-जामगे पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धीची आशा निर्माण करणाऱ्या जामगे धरणाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. सध्या युद्धपातळीवर सुरू असलेल्या कामामुळे पंचक्रोशीतील जनतेमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
पाणीटंचाईने त्रस्त असलेल्या या भागातील शेतकऱ्यांच्या शेतीला सिंचनाची सुविधा मिळावी, या हेतूने २००९ साली लघुपाटबंधारे विभागामार्फत जामगे धरणास मंजुरी मिळाली. प्रत्यक्ष कामाला २०१० मध्ये सुरुवात झाली, मात्र केवळ काही दिवसांतच ते थांबले. पुढे २०१३ मध्ये पुन्हा प्रयत्न झाले, पण ठेकेदाराने काम अर्धवट सोडले. २०१९ मध्ये पुन्हा धरणाच्या कामाला गती देण्यात आली, परंतु स्थानिक शेतकऱ्यांच्या काही आक्षेपांमुळे पुन्हा एकदा काम थांबले. अखेर २०२४ मध्ये पुन्हा नव्या दमाने सुरू झालेलं हे काम आज ७० टक्क्यांपर्यंत पूर्ण झाले आहे.
धरण पूर्ण झाल्यानंतर या भागातील सुमारे १५ गावांतील शेतकऱ्यांच्या शेतीसाठी पाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शेतीची उत्पादकता वाढून आर्थिक समृद्धीचा मार्ग मोकळा होणार आहे. विशेष म्हणजे, उन्हाळ्यातील तीव्र पाणीटंचाईदेखील यामुळे कमी होईल, अशी आशा स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे.
शेतकऱ्यांच्या आशांना मिळणार हक्काचं पाणी
पंधरा वर्षांची प्रतीक्षा, अनेक अडथळे, थांबलेली कामं, बदललेले ठेकेदार… या सर्व अडथळ्यांवर मात करत अखेर जामगे धरणाचे स्वप्न सत्यात उतरत आहे. हे धरण पूर्ण झाल्यास पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्या डोळ्यांत आज असलेली आशा लवकरच समाधानात परिवर्तीत होईल.