(रत्नागिरी /प्रतिनिधी)
सार्वजनिक रस्त्यांवर वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने वाहने उभी केल्याप्रकरणी चिपळूण आणि रत्नागिरी परिसरात दोन चालकांविरोधात पोलिसांनी कारवाई केली. पालवण फाटा येथे ईको वाहन, तर कारवांचीवाडी फाटा ते गयाळवाडी मार्गावर रिक्षा रस्त्यात अडथळा निर्माण होईल अशा स्थितीत उभी केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. या दोन्ही प्रकरणांत भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम २८५ अन्वये गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
सावर्डे पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग सुरू असताना १५ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी एकच्या सुमारास पालवण फाटा येथे ईको वाहन रस्त्यावर उभे असल्याचे आढळले. वहाळ फाटा ते तरंबव या मार्गावर येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांना तसेच पादचाऱ्यांना अडथळा निर्माण होईल अशा स्थितीत वाहन उभे केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल सतीश सिताराम कदम (वय ५०, नेमणूक सावर्डे पोलीस ठाणे) यांनी फिर्याद दिली आहे. अंकुश विजय शिरकर (वय ३२, रा. कळंबट सुतारवाडी, ता. चिपळूण) यांच्या ताब्यातील एमएच ४६ एक्यू ६०९६ क्रमांकाच्या ईको वाहनाबाबत ही कारवाई करण्यात आली.
दुसरी घटना रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. १५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७.२० वाजण्याच्या सुमारास कारवांचीवाडी फाटा ते गयाळवाडी मार्गावर वाहतुकीला अडथळा आणि धोका निर्माण होईल अशा स्थितीत रिक्षा उभी असल्याचे पोलिसांना आढळले. या प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर चंद्रकांत साळवी (वय ४१, नेमणूक रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे) यांनी फिर्याद दिली आहे. परेश बाबाराम कांबळे (वय २७, रा. पानवल बौद्धवाडी, ता. जि. रत्नागिरी) यांच्या ताब्यातील एमएच ०८ एक्यू ८६२६ क्रमांकाच्या रिक्षेबाबत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.


