(राजापूर)
तालुक्यातील कोंड्येतर्फे सौंदळमधील खालचीवाडी येथे रानगवा विहिरीत पडून मृत झाल्याची घटना गुरुवारी घडली. हा रानगवा नर जातीमधील असून, त्याचे वय दीड वर्षे असल्याची माहिती वनविभागाने दिली. विच्छेदनानंतर र मृत गव्याला लाकडाची चिता रचून अग्नी देण्यात आला.
तालुक्यातील कोंड्येतर्फे सौंदळमधील खालची वाडीमधील माधव गजानन हर्डीकर यांनी राजापूर वनपालांना भ्रमणध्वनीवरून संपर्क करून त्यांच्या बागेतील विहिरीत रानगवा पडून मृत झाल्याची माहिती दिली. त्याची दखल घेऊन राजापूरच्या वनपालांनी परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी यांना माहिती दिली. त्यानंतर, परिक्षेत्र वनअधिकारी हे राजापूर वनपाल यांच्यासह वनरक्षक आणि रेस्क्यू टीमसह घटनास्थळी हजर झाले. तेथे जाऊन त्यांनी पाहणी केली. माधव हर्डीकर यांच्या बागेत असलेल्या विहिरीत रानगाव पडून मृत अवस्थेत असल्याचे दिसले. त्यानंतर, मृत रानगव्याला विहिरीत जेसीबीच्या साहाय्याने दोरी टाकून विहिरीबाहेर काढण्यात आले.
मृत रानगवा नर जातीचा असून, त्याचे वय सुमारे दीड वर्ष असल्याचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. किनरे यांनी सांगितले. या कामगिरीसाठी सहायक वनसंरक्षक प्रियांका लगड चिपळूण, रत्नागिरीचे वनक्षेत्रपाल प्रकाश सुतार, राजापूरचे वनपाल जयराम बावदाणे, वनरक्षक विक्रम कुंभार, रेस्क्यू टीमचे दीपक चव्हाण, विजय म्हादये, दीपक म्हादये, नितेश गुरव, संतोष चव्हाण, नीलेश म्हादये उपस्थित होते. अशा प्रकारच्या घटना घडल्यास किंवा वन्यप्राणी अडचणीत सापडल्यास वनविभागाचा टोल फ्री क्रमांक १९२६ किंवा ९४२१७४१३३५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन रत्नागिरीचे वनक्षेत्रपाल प्रकाश सुतार यांनी केले आहे.
विहिरीत पडूनच मृत्यू
मृत पावलेल्या रानगव्याची शिकार किंवा विषबाधा झाली आहे काय, याची खात्री करण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रभास किनरे यांना पाचारण करण्यात आले. त्यांनी केलेल्या शवविच्छेदनानुसार विहिरीत पडूनच रानगव्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. किनरे यांनी सांगितले.