(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड बौद्धवाडी येथील बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक 17 तथा बौद्ध ग्रामस्थ मंडळ मालगुंड आणि आदर्श महिला मंडळ मालगुंड यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमात रत्नागिरी येथील त्रिरत्त्न बौद्ध महासंघाचे धम्मचारी गौतम शिंदे तथा सत्यसागर यांचे भारतीय संविधानातील मूलभूत अधिकार आणि बाबासाहेबांची धम्मक्रांती या विषयावर आधारित विशेष प्रबोधनात्मक प्रवचन संपन्न झाले. हा कार्यक्रम मालगुंड शाखेचे अध्यक्ष रविकांत पवार गुरुजी यांच्या प्रमुख अध्यक्षतेखाली धम्मचेतना बुद्ध विहारात घेण्यात आला.
या कार्यक्रमाच्या प्रारंभी धम्मचेतना बुद्ध विहारातील महामानवांच्या प्रतिमाना पुष्पहार अर्पण करून गंध दीप प्रज्वलन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर धार्मिक पूजापाठ धम्ममित्र तथा बौद्धाचार्य वैभव पवार ,धम्मचारी सत्यरत्न आणि सत्यसागर यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली घेण्यात आला. त्यानंतर उपस्थित धम्म बंधू भगिनींनी सामुदायिकपणे संविधानाची उद्देशिका ग्रहण केली. या उद्देशिकेचे वाचन धम्ममित्र वैभव पवार यांनी केले. यानंतर या कार्यक्रमात धम्मचारी सत्यसागर यांनी भारतीय संविधानाबद्दल बोलताना विविध उदाहरणे देऊन संविधानातील हक्क व अधिकार यांची जाणीव आपल्याला व्हायला पाहिजे तसेच बाबासाहेबांनी केलेल्या धम्मक्रांतीबद्दल आपण जागरूक राहून आचरणशील जीवन जगले पाहिजे आणि धम्मचळवळ गतिमान करण्यासाठी कटिबद्ध व्हायला पाहिजे अशा स्वरूपात विशेष प्रबोधनात्मक मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय मनोगतात रविकांत पवार गुरुजी यांनी धम्मचारी सत्यसागर यांनी उपस्थित बंधू-भगिनींना केलेल्या मौलिक प्रबोधनाबद्दल आभार व्यक्त करून त्यांनी सर्वांना भारतीय संविधानाच्या अभ्यासाबद्दल अधिक जागृत होण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाला रत्नागिरी येथील त्रिरत्त्न बौद्ध महासंघाचे धम्मचारी सत्यरत्न, धम्ममित्र सौरभ पवार आणि मालगुंड येथील मराठवाडी महसूल गावचे अमोल राऊत यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच या कार्यक्रमाला मालगुंड शाखेचे सर्व प्रमुख पुरुष पदाधिकारी व आदर्श महिला मंडळाच्या सर्व प्रमुख पदाधिकारी आणि आणि धम्मबंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाखेचे सचिव शाम पवार यांनी तर आभार प्रदर्शन उपसचिव मयुरेश पवार यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मालगुंड शाखेच्या सर्व प्रमुख पदाधिकारी व सभासद बंधू-भगिनीनी विशेष मेहनत घेतली.